शून्यातून यशोशिखराकडे

जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत : एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम
विनायक लांडे
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी जिद्द, चिकाटी, चातुर्य आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक मिळवला. जीवनात खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जात त्यांनी आपले आयुष्य सार्थक केले. त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंचा केलेला उलगडा तरुणांसाठी नक्कीच पथदर्शी ठरेल.जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत यांचा जन्म पारनेर तालुक्‍यातील एका छोट्याशा गावात वडगाव गुंड येथे 2 सप्टेंबर 1982 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍यातील वडनेर असून, प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले. माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला, शिरूर येथे झाले. त्यांचे बी.एस्सी. ऍग्रीचे शिक्षण नागपूर येथे 1999 चे 2003 या कालावधीत झाले. त्यांचे वडील विष्णू भीमाजी निचीत हे शिक्षक होते. आई कासुबाई, बहिणीचे नाव प्रमिला आढाव, लहान भाऊ डॉक्‍टर प्रवीण निचीत, दोन मुली ओजस्वी व अनुष्का, पत्नी शीतल हिची त्यांना मोलाची साथ मिळाली. असा एकत्रित कुटुंबाचा वारसा त्यांनी जपला आहे. निचीत हे मूळचे वडनेरचे असले तरी त्यांचा जन्म पारनेर तालुक्‍यातील वडगाव गुंड या गावी झाला असल्याने त्यांची या नगरी मातीशी नाळ जोडली गेली आहे. संगमनेर येथे शहरातील अतिक्रमण काढण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. तसेच, अकोले येथे फोफसंडीत त्यांनी समाधान मेळावे घेतले. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. संगमनेर जिल्ह्यात डिव्हिजन महसूल समन्वय समिती स्थापन केली. त्या समितीतून तलाठी, पोलीस पाटील, आदी नवीन निर्णयाची माहिती या समितीमार्फत देण्यात येते. त्यामुळे पोलीस पाटील, तलाठी यांना खूप फायदा झाला.
शासकीय सेवेतील प्रवास
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा म्हणजेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास राहुरी कृषी विद्यापीठ येथील कृषी एकता मंच येथे स्वअध्ययन करून केला. एमपीएससीची पूर्व परीक्षा 2004, तर मुख्य परीक्षा 2005-2006 मध्ये देऊन त्यांनी राज्यात अव्वल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी न्यू लॉ कॉलेज, पुणे येथे एलएलबीचे शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात पुणे जिल्हा परिषद येथे ग्रामसेवक पदावर काम केले. त्यानंतर सोलापूर येथे परिवेक्षक अधिकारी म्हणून काम केले. सांगली येथे प्रांत म्हणून 2009 ते 2012 या कालावधीमध्ये भूसंपादन विभागात काम केले. 2012 ते 2016 या दरम्यान संगमनेर येथे प्रांत म्हणून काम केले. 2016 ते आजपर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण कामे
शासकीय सेवेत असताना त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामे केली आहेत. सांगली येथील जत या गावी तहसीलदारपदी 20 मार्च 2008 रोजी रूजू झाले. त्याठिकाणी 225 गावे पूर्ण दुष्काळी होती. त्यावेळी दुष्काळाचा सामना करताना तेथे 25 जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. त्या गावात पाण्याचे योग्य नियोजन केले. या सर्व गावांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला. 23 चारा डेपो, त्याचे रेकॉर्ड ठेवणे, त्यातच त्या भागात कन्नड भाषेचा प्रभाव होता. पन्हाळा येथे प्रांत असताना ग्रामभेट योजना राबविली. प्रलंबित नोंदी, संजय गांधी घरकूल योजना प्रभावीपणे राबविली. तसेच, सांगली भूसंपादन असताना म्हैसाळ योजना, टेंभू सिंचन योजना, तसेच मिरज-पंढरपूर ब्रॉडगेज भूसंपादन केले. संगमनेर येथे 4 वर्षांच्या कालावधीत अनेक कामे मार्गी लावली. त्यात संगमनेर तालुक्‍यात 3 मंत्र्यांचा कारभार असताना लोकसभा, विधानसभा सर्व निवडणुका पार पाडल्या. त्या तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्याने गारपीट अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. काकडी विमानतळाचे भूसंपादन केले. सुवर्णजयंती अभियानांतर्गत अकोले येथे 57 गावे दाखलेमुक्त केले.
उत्कृष्ट कामांबाबत मिळालेले पुरस्कार
2014 साली राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत 50 हजारांचा पुरस्कार मिळाला. कार्यकुशल उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 20 एप्रिल 2015 मध्ये महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कार्यकालात पुरस्कार मिळाला होता. तसेच, 20 मार्च 2016 ला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचा पुरस्कार मिळाला.
यशस्वी प्रयोग
डिजिटल स्वाक्षरीतून जलयुक्त अभियान यशस्वीपणे राबविले. नगर येथे रेशनकार्ड मिळण्याला ज्या अडचणी होत्या त्या सोडविण्यासाठी दर सोमवारी रेशन अदालत घेण्याचा निर्णय घेतला. धान्यासाठी वाहतूक सुरळीत करणे, ऑनलाइन चलन योजना, पॉस मशीन, सीसीटीव्हीचा प्रयोग, ऑनलाइन दाखले, त्यांनी राबविलेल्या आम आदमी विमा योजनेत शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. असे अनेक यशस्वी प्रयोग त्यांनी राबविले.
आनंदाचा क्षण, आवडते छंद…
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला हा त्यांच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होता, तर सायकलिंग, वाचन करणे हे आवडते छंद आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)