शून्यातून गगनभरारी घेणारा युवा उद्योजक!

वडगाव मावळ : मावळची मटकी मिसळ व भेळ दुकानात मिसळ पाव व भेळ खाण्यासाठी झालेली गर्दी.
  • “मावळची मटकी मिसळ व भेळ’ची चव न्यारी

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन लोणावळ्याकडे जाताना मावळ तालुक्‍यात वडगाव आवर्जुन थांबून “मावळची मटकी मिसळ व भेळ’ खा. जिभेवर चव रेंगाळावी, अशी खवय्यांच्या पसंतीस उतरलेली मटकी भेट आणि मिसळ खाण्यासाठी पुणे, मुंबईचे पर्यटक येतात. शुन्यातून गगनभरारी घेणाऱ्या युवा उद्योगाची यशोगाथा…

वडगाव (ता. मावळ) येथील पांडुरंग हरिभाऊ भिलारे व राधाबाई पांडुरंग भिलारे दाम्पत्याला युवा उद्योजक संतोष भिलारे, संदीप व कविता ही अपत्य. पांडुरंग भिलारे यांचे सन 2000 साली अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर कुटुंबाचा जबाबदारी आई राधाबाई यांच्यावर आली. कुटुंबाची परवड होऊ लागल्याने मुलगा संतोष भिलारे यांना दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण न करता आले नाही. अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ संतोषवर आली. भाऊ संदीप व बहीण कविता यांचे शिक्षण व कुटुंबाची जबाबदारी आल्याने वडीलबंधू म्हणून संतोष यांच्यावर आली आणि परिस्थितीशी झगडण्याचा खरा संघर्ष सुरू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकाळी घरोघरी वर्तमानपत्र टाकणे, कपड्याच्या दुकानात, हॉटेलमध्ये, शेतात, कंपनीत मिळेल तिथे काम करुन कुटुंबाचा गाडा चालविला. स्वतः ला शिक्षण पूर्ण न करता आल्याने संतोष भिलारे यांनी भाऊ संदीप व बहीण कविता यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. संतोष भिलारे यांचा विवाह उकसान येथील वसंत शिवराम कोंढरे यांची मुलगी नेहा हिच्यासोबत झाला.
अनेक क्षेत्रात कामाचा अनुभव घेऊन वडगाव मावळ येथे संतोष यांनी प्रथम कपड्यांना इस्त्री करण्याचे छोटेसे दुकान उभारले. या कामात पत्नी नेहा मदत करू लागली. याच दुकानात काही दिवसांनी ‘मावळची मटकी मिसळ व भेळ’ याचे नामकरण करुन मिसळ पाव व मटकी भेळ विकण्याला सुरुवात केली. मावळची मटकी मिसळ व भेळला लागणारे सर्वच पदार्थ बनविले जात असल्याने मिसळ व भेळला विशिष्ट चव व दर्जा असल्याने मावळ तालुक्‍यात प्रसिद्धी मिळाल्याने या दुकानावर नेते, अभिनेते, उद्योजक, पर्यटक, विद्यार्थी व नागरीक वडगाव मावळला आल्यावर वेळात वेळ काढून मटकी मिसळ व भेळ खाऊन सोबत घेऊन जाऊ लागले. अनेक वेळा ग्राहकांना बसण्यास जागा अपुरी पडत असल्याने मटकी मिसळ व भेळ सोबत नेली जाते.

युवा उद्योजक संतोष भिलारे यांचा स्वभाव मनमिळाऊ, मितभाषी व गरीब गरजूंच्या मदतीला धावणारा असल्याने त्यांचा चाहतावर्ग अधिक आहे. पुणे, मुंबई, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व इतर जिल्ह्यातील नागरिक जमीन खरेदी-विक्री करता मोठ्या प्रमाणात येत असून “मावळची मटकी व भेळ’ या दुकानाला आवर्जून भेट देतात. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बाजूला असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मावळची मटकी मिसळ व भेळ अनेक जिल्ह्यात पोहोचली असून, वडगावतील नागरिक फिरण्यासाठी बाहेर गेल्यास मावळची मटकी मिसळ व भेळची अवश्‍य आठवण काढतात. वडगाव मावळ येथील विद्यार्थी व नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. सोमवारी मावळची मटकी मिसळ व भेळ या दुकानाला सुट्टी असली तरी विशेष दर्जा व चविष्ट असलेल्या मटकी मिसळ व भेळ खाण्यासाठी येतात.

एक छोट्याशा दुकानातून मावळची मटकी मिसळ व भेळ व्यवसायाला सुरुवात केली बघताबघता आठ वर्षांत मावळची मटकी मिसळ व भेळच्या दुकानाच्या तीन शाखा सुरू झाल्या आहेत. 1) जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत, विजय कॉलनी, वडगाव (ता. मावळ) या दुकानावर युवा उद्योजक संतोष भिलारे, जुन्या पुणे- मुंबई महामार्गालगत, भेगडे लॉन्स जवळ दिग्विजय कॉलनी, वडगाव (ता. मावळ) या दुकानावर उद्योजक संतोष भिलारे यांची पत्नी नेहा. व जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत, पवनानगर चौक, इंद्रायणी कॉलनी, कामशेत ता. मावळ. या दुकानावर संतोष भिलारे यांचा भाऊ संदीप आदी ठिकाणी मावळची मटकी मिसळ व भेळ दुकानाच्या शाखा चालवीत आहे.

संतोष भिलारे यांनी सुदुंबरे येथील अभियंता कुलदीप जयसिंग गाडे यांच्याशी मोठ्या थाटामाटात बहीण कविता हिचे लग्न लावून दिले. केवळ एकाच दुकानावर कुटुंबातील सर्व व्यक्तींनी न थांबता स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी तीन शाखा सुरु केल्या. संतोष भिलारे यांचे दोन मामा मूकबधिर असल्याने त्यांचा सांभाळ तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देतात.

लहान असताना वडील गेल्याने कुटुंबाची जबाबदारी आल्याने शिक्षण पूर्ण न करता आल्याने दुःख होते. मला व्यवसायासाठी प्रसिद्ध दूग्ध व्यावसायिक विश्‍वनाथ हिंगे, उद्योजक बंडोपंत भेगडे व बबन कोंढरे यांचे तसेच नातेवाईकांचे सहकार्य लाभले. या व्यवसायासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची अतूट साथ असल्याने शक्‍य झाले. समाजाच्या शाळेत अनेक अनुभव शिकल्याने मी माझ्या भावाचे व बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. माझ्या जीवनसंघर्षाची कहाणीच मला प्रेरणा देत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न पळता व्यवसाय करावा. एक व्यवसायातून अनेकांना रोजगार देऊ शकतो. व्यवसाय करताना ग्राहक आपले दैवत समजून त्यांची सेवा केल्यास वारंवार ग्राहक आपल्याकडे खरेदीसाठी येतात. व्यवसाय करत असलेल्या तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. प्रत्येक दिवसाचे सोने करण्यासाठी प्रसन्न मनाने व्यवसायात सातत्य ठेवणे, ग्राहकांशी नाते निर्माण केल्यास व्यवसाय पुढे जाण्यास सहकार्य होते.
– संतोष भिलारे, युवा उद्योजक.

संकलन : महादेव वाघमारे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)