शुुभदाच्या डोकेदुखीचा उपाय एकच…

30 वर्षांची शुभदा (नाव बदलले आहे) एकदा भेटायला आली. तिच्याबरोबर तिची आई आली होती. भेटीसाठी आली तेव्हा शुभदा खूप अस्वस्थ वाटत होती. पण काहीवेळ गेला तरी ती बोलायला तयार होईना. म्हणून मग तिच्या आईनेच पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली.
शुभदाचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहानंतर तिच्या नवऱ्याची बदली झाल्याने त्या दोघांना दुसऱ्या शहरात रहायला जावे लागले. तिथे जाऊन काही महिने झालेदेखील उच्च शिक्षित असल्याने नवीन घराची घडी नीट बसल्यावर तिनेदेखील नोकरी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे एक-दोन महिने चांगले गेले. पण नंतर मात्र हळूहळू तिला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. धावपळीमुळे त्रास होत असावा असे वाटून सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर नंतर तिचा हा त्रास वाढतच गेला. ही डोकेदुखी तिला असह्य व्हायला लागली. म्हणून ती डॉक्‍टरांकडे गेली. डॉक्‍टरांनी लक्षणे विचारून औषधे दिली. पण त्याचा काहीच उपयोग होईना.
हळूहळू या डोकेदुखीबरोबर अंगावर सतत पुरळ उठण्याचा त्रासही तिला होऊ लागला. याहीकडे तिने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण डोकेदुखीप्रमाणेच तिचा हा त्रासही वाढतच गेला. त्यामुळे यावरही तिने डॉक्‍टरांकडे जाऊन उपाय घ्यायला सुरुवात केली. पण डोकेदुखीप्रमाणेच याही आजारावर कोणताच उपाय लागू होईना. त्यामुळे डॉक्‍टरांनी तिला बऱ्याच शारीरिक तपासण्या करून घेण्यास सांगितले. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या चाचण्या करून घेतल्यानंतर असे समजले की तिच्या या त्रासामागे कोणतेच शारीरिक कारण नाही. कारण तिच्या सर्व चाचण्यांचे रिपोर्टस अगदीच “नॉर्मल’ आहेत. म्हणजेच तिच्या डोकेदुखी आणि शरीरावर पुरळ उठणे या त्रासांमागे कुठलेच शारीरिक कारण नाही. हे समजल्यावर मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलं. कारण त्रासाचं निदानच न झाल्याने काय उपाय करावेत हे कोणालाच समजेना आणि चालू असलेल्या उपायांचा आजारावर काहीच उपयोग होईना! तेव्हा डॉक्‍टरांनी तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जाण्याचा सल्ला त्यांना दिला.
डॉक्‍टरांनी असे सांगितल्यामुळे शुभदा आणखीनच घाबरली. आपल्याला काहीतरी मानसिक आजार झाला. या विचाराने ती आणखीच घाबरून गेली. म्हणून ती आईकडे रहायला आली आणि आई बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला समुपदेशनासाठी घेऊन आली. ही सारी समस्या लक्षात आल्यावर सर्वप्रथम तिला हा विश्‍वास दिला की ही कोणतीही गंभीर मानसिक समस्या नाही. पण यावर योग्य वेळी उपाय करणे आवश्‍यक आहे. यात कोणतीही गंभीर मानसिक समस्या नाही हे समजल्यावर शुभदावरचा आणि आईवरचा ताण कमी झाला.
ताण कमी झाल्याने शुभदा मोकळेपणाने बोलायला लागली. तिच्याबरोबर संवाद साधताना असे लक्षात आले की शुभदाला लग्नापूर्वी फारसे काम करण्याची सवय नव्हती. लग्नानंतरही ती एकत्र कुटुंबात रहात असल्याने तिच्यावर कामाचा फारसा ताण पडत नव्हता. नोकरीवरून घरी आल्यावर जमेल तसं काम ती करत होती. पण नवऱ्याची बदली झाल्याने आणि स्वतंत्र संसार उभा करावा लागल्याने आता मात्र घरातल्या प्रत्येक लहान-मोठ्या कामांची जबाबदारी शुभदावर पडायला लागली. त्यातच स्वतंत्र संसार उभा करावा लागल्याने आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी तिलाही नोकरी करणे भाग होते. या दोन्ही बाजू सांभाळणं तिला जड जात होतं.
नवऱ्याला घरकामात मदत करायची सवय नसल्याने तिची खूपच धावपळ व्हायची. कामात गोंधळ व्हायचा. चुका व्हायच्या त्यामुळे घरी नवरा आणि कंपनीत बॉस यांचा सतत रोष पत्करावा लागायचा. त्यामुळे आपण घर सांभाळायला, परिस्थितीला तोंड द्यायला असमर्थ आहोत अशी अपराधी भावना सतत तिच्या मनाला टोचत रहायची. मी सर्व जबाबदाऱ्या पार पाडायला असमर्थ आहे. हा एकच विचार तिच्या मनात पक्का बसला होता. या विचारामुळे तिच्यावर आलेल्या या अतिरिक्त ताणामुळेच तिला डोकेदुखी आणि पुरळ उठणे हे शारीरिक त्रास उद्‌भवले होते.
तिची ही समस्या लक्षात आल्यावर तिला तसेच तिच्या नवऱ्यालादेखील हा ताण कमी करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. हा अतिरिक्त ताण आणि त्याचे शारीरिक परिणाम कमी करण्यासाठी काही मानसशास्त्रीय उपचार पद्धती व तंत्रांचा यात समावेश करण्यात आला. याला दोघांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याने शुभदाच्या शारीरिक त्रासांमध्ये चांगली सुधारणा घडून आली आणि ती पुन्हा नव्या जोमाने दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने पार पाडण्यास सज्ज झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)