शुल्कपूर्तीचा लाभ सर्वांना मिळणार

पुणे – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्रतेसाठी किमान 60 टक्के गुणांची अट शिथील करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. पदविका व पदवी अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना पात्रतेसाठी इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान 60 टक्के गुणांची अट घालण्यात आली होती. तसेच उत्पन्न मर्यादाही 6 लाखांपर्यंत निश्‍चित करण्यात आली होती. त्यानुसार मागील शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू करण्यात आली. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून मात्र त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पूर्वीची 60 टक्के गुणांची अट यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रेतेची 60 टक्के गुणांची अट शिथिल करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. आता सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही अट काढून टाकण्यात आल्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी केला.
तंत्र शिक्षण संचालनालय, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय आणि वैद्यकीय शिक्षण औषधीद्रव्ये या विभागांतर्गत असलेल्या सर्व पदवी व पदविका अभ्यासक्रमांना हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अभियांत्रिकी किंवा अन्य तंत्र तसेच कृषी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी 60 हून कमी असते. तसेच या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्नही सहा लाखांहून कमी असेत. पूर्वीच्या 60 टक्के गुणांच्या अटीमुळे हे विद्यार्थी योजनेपासून वंचित राहत होते. नवीन निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)