शिस्त

   अबाऊट टर्न

आमची पुण्यातली मावशी नुकतीच अमेरिकेला जाऊन आली. पुणेकर म्हणतील, यात काय नवल आहे? खरंय, आजकाल बऱ्याच जणांची पोरंबाळं परदेशात असल्यामुळं परदेशवारीचं कौतुक पूर्वीइतकं राहिलेलं नाही. आम्ही कधीही परदेशात गेलेलो नसल्यामुळं आणि मुक्‍कामाला पुण्यात नसल्यामुळं परदेशवारीचं कुतूहल टिकून आहे. हे कुतुहल मावशीचं बोलणं ऐकून आणखी वाढलं. तिकडची माणसं किती शिस्तप्रिय आहेत, नियम कसे कडक आहेत, हे सांगणे तिकडे जाऊन आलेल्या लोकांना खूप आवडतं. याच शिस्तप्रियतेची माहिती देताना मावशीनं सांगितलं की, तिकडे आपलं मांजर शेजाऱ्यांच्या घरात गेलं, तरी आपल्याला दंड भरावा लागतो.

वस्तुतः या शिस्तीचं कौतुक वाटून आम्ही डोळे विस्फारणं अपेक्षित होतं. पण का कुणास ठाऊक; अशा वेळी आम्हाला एकदम रिऍक्‍ट होता येत नाही. डोळे जरूर विस्फारले; पण धक्‍क्‍यामुळं! अशा वेळी आम्हाला अतोनात प्रश्‍न पडतात. मांजरी आमच्या घरीही आहे. पण शेजाऱ्यांच्या घरात जायचं नाही, हे तिला सांगायची वेळ आली तर कसं सांगायचं, असा प्रश्‍न पडला. कुत्र्याप्रमाणं मांजरीला बांधूनही ठेवता येत नाही. परदेशातली माणसं शिस्तप्रिय असतील खरी; पण त्यांच्या पाळीव प्राण्यांना ही शिस्त, हे नियम कळतात कसे? आमच्या मांजरीने शेजाऱ्यांच्या घरातल्या दुधाला कधीही तोंड लावलेले नाही की सांड-लवंडही कधी केलेली नाही; पण ती शेजाऱ्यांकडे जातेच. काही बेसिक नियम
स्वतःहून पाळते. गुणी असल्यामुळं शेजारीही तिचं खूप कौतुक करतात.

प्राणिशिस्तीचे विदेशी नमुने मावशीकडून ऐकता-ऐकता आम्हाला काही मूलभूत प्रश्‍न पडले. समजा, आपल्याकडे एक मांजरी आहे आणि शेजाऱ्यांकडे एक बोका आहे. त्या दोघांचं सूत जमलं, तर त्यांनी भेटायचं कुठं? दोन्ही घरांच्या कुंपणभिंतीवर भेट झाली, तर दंड कुणाला होणार? कुत्र्या-मांजरांच्या भांडणाचे आवाज विदेशात ऐकूच येत नसतील का? हद्दीचे नियम आपल्याकडे वन्यजीवांच्या बाबतीत लावलेत, हे खरं. एखाद्याची शेळी चरता-चरता वनखात्याच्या हद्दीत गेली आणि बिबट्यानं फस्त केली, तर नुकसानभरपाई मिळत नाही; पण बिबटोबांनी गावठाण हद्दीत घुसून शिकार केली तर भरपाई द्यावी लागते म्हणे! खरं तर याही बाबतीत, प्राण्यांना हद्दी कशा कळाव्यात, हा प्रश्‍न उरतोच.

पण नियम म्हणजे नियम! माणसांनी तयार केले असले आणि प्राण्यांवर लागू असले तरी अखेर ते नियमच! भांडणतंटा होऊ नये, असं वाटत असेल, तर असे नियम करावेच लागतात. तंटा-बखेडा झालाच तर नेमक्‍या कुणाकडून नियमभंग झालाय हे कळायला हवंच. अर्थातच नियमभंग करणार पाळीव प्राणी आणि शिक्षा भोगणार त्यांना पाळणारे हौशी नागरिक! पुणे महापालिकेच्या मनात तरी सध्या असंच काहीतरी आहे. कुत्रा, मांजर, ससा, पोपट… अगदी हौस म्हणून माकडसुद्धा पाळू शकता तुम्ही; पण त्यापूर्वी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. पाळीव प्राण्यांवरून पुणेकरांमध्ये भांडणं होतात, म्हणून हा निर्णय घेतलाय म्हणे! अर्थात, बऱ्याच वेळा भांडणासाठी प्राणी फक्‍त निमित्त ठरतात आणि खरी कारणं वेगळीच असतात, हे सर्वश्रुत आहे. तरीही प्राणिपालनाची नियमावली तयार करण्याचा घाट पालिकेनं घातलाय. भटके प्राणी नशीबवान. स्वातंत्र्याची गाणी केवळ तेच गाऊ शकणार!

– हिमांशु


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)