शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

गणोरे, दि. 18 (वार्ताहर)- राज्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्‍त सुखदेव डेरे यांनी दिली. राज्यात प्रथमच शिक्षण हक्‍क कायद्याच्या अस्तित्वानंतर चौथी व सातवीच्या परीक्षा रद्द करीत शासनाने एक वर्षाच्या विरामानंतर घेतलेली ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे अनेकांचे या परीक्षेकडे लक्ष लागून होते. राज्याचा निकाल अवघा 18 टक्‍के लागला आहे.
पाचवीसाठी 5 लाख 45 हजार 881 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते; त्यापैकी 5 लाख 26 हजार 597 परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी एक लाख 12 हजार 856 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. शेकडा 21.43 टक्‍के विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. तर, आठवीसाठी 4 लाख 3 हजार 301 अर्ज सादर केले होते; पैकी 3 लाख 90 हजार 855 जणांनी परीक्षा दिली. यामध्ये 12 हजार 446 विद्यार्थी गैरहजर होते. 52 हजार 567 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण अवघे 13.45 टक्‍के आहे. राज्यात एकूण 9 लाख 49 हजार 182 विद्यार्थ्यांपैकी 9 लाख 17 हजार 452 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 65 हजार 423 विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. हे प्रमाण अवघे 18.3 टक्‍के आहे. राज्यातील 636 विद्यार्थ्यांचे निकाल विविध कारणांनी राखीव ठेवण्यात आले आहेत.
परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या आदिवासी विद्या निकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व उच्चप्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. संकेतस्थळावरून निकाल प्राप्त करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी प्रत्येक पेपरकरिता 50 रुपये, तर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिकरिता प्रति पेपरसाठी 100 रुपये ऑनलाइन भरून प्राप्त करता येईल. विद्यार्थ्यांच्या संबंधी बदलाकरिता 31 मे पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. आवश्‍यक ती माहिती 30 दिवसानंतर कळविण्यात येईल. सदरच्या माहितीचे अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम गुणवत्तायादी व अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे डेरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)