दात्यांना अर्पण केली श्रद्धांजली
“दिशा’ परिवार संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या दानशूर व्यक्‍तींना कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यात स्व. सुनीती फडके आजी, स्व. राजू डांगी, स्व. काशीनाथ आंबेकर, स्व. सुहासिनी कोटकर, स्व. गोकुळचंद खंडेलवाल यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्‍त करत त्यांचे स्मरण करण्यात आले.

कृतज्ञता सोहळ्यात दानशुरांचा सन्मान : “दिशा’ परिवार संस्थेचा उपक्रम

पुणे – जात-पात, धर्माचा भेद न पाळता गुणवंत, पण गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृती देणाऱ्या “दिशा’ परिवार संस्थेतर्फे नुकताच कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या दात्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

“दिशा’ परिवार संस्थेतर्फे गेली 11 वर्षे दानशूर व्यक्‍तींनी गरीब, गरजू आणि गुणवत्ता असणाऱ्या तब्बल 3 हजार 500 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या शिक्षणास हातभार लावला आहे. यामुळे अनेक विद्यार्थी डॉक्‍टर, इंजिनिअर अशा विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवत आहेत.

गरजू मुलींसाठी वसतिगृह
“दिशा’ परिवारातर्फे गरजू आणि गरीब मुलींसाठी वाघोली परिसरात वसतिगृह उभारले जात आहे. त्यासाठी 1 कोटी 65 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. विविध दात्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटी 30 लाख रुपये निधी उभारण्यात आला आहे. उर्वरित रकमेसाठी समाजातील दात्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन “दिशा’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

येथील एस. एम. जोशी सभागृहात पार पडलेल्या या अनोख्या कृतज्ञता सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माणिकराव गोते, कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, शिष्यवृत्ती नियोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर रोजेकर, प्रा. भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते. यावेळी श्री. व सौ. प्रभाकर मालपुरे, श्री. व सौ. मनोहर जोग, अशोक दातार व सौ. इंद्रायणी दातार, रत्नागिरी येथील गजानन जोशी, श्रीमती सुषमा जोगळेकर, श्री. दांडेकर, गोविंद दाते, विश्‍वेश्‍वर सहकारी बॅंक, पुणेचे चेअरमन सुनीलशेठ रुकारी, सुबोध म्हात्रे, मुंबई, कांतीलालजी राठोड, बापू चिटनीस, सुधाकर घोडेकर, “व्यापारी मित्र’चे संस्थापक श्री. जी.डी. शर्मा, श्रीकांत फडके व स्नेहा फडके आदी दात्यांचा तसेच साऊथ अमेरिकन विद्यापीठाची डी.लिट. पदवी मिळाल्याबद्दल प्रा. भाऊसाहेब जाधव यांचाही यावेळी “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रा. जाधव म्हणाले, “गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याची समाजातील अनेक व्यक्‍तींची इच्छा असते. मात्र, काही संस्थांकडून येणाऱ्या वाईट अनुभवांमुळे ते मदतीसाठी धजावत नाहीत. शिवाय ज्या संस्थांना मदत केली जाते, त्यांच्याकडून त्या रकमेचा उपयोग प्रामाणिकपणे केला जात नसल्याचे दिसून येते. मात्र, “दिशा’ परिवार संस्थेतर्फे त्यांना आतापर्यंत मिळालेल्या देणगीस्वरूप रकमा उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणल्या. यावेळी जाधव यांनीही संस्थेच्या नवीन वसतिगृहासाठी 5 लाख रुपयांचा धनादेश दिला.’
या सत्कार सोहळ्यादरम्यान धनंजय आपटे आणि स्मिता आपटे यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. तर, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जास्तीत-जास्त दानशुरांनी पुढील काळात मदत करण्याचे आवाहन यावेळी रोजेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)