शिष्यवृत्तीची रक्‍कम अखर्चित, याला जबाबदार कोण?

जिल्हा परिषदे स्थायी समितीच्या बैठकीच भाजप गटनेते शरद बुट्टे पाटील यांचा प्रश्‍न

पुणे – जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम अखर्चित आहे, असे असताना विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्तीचे वाटप का होत नाही, त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत उपस्थित केला. त्यावेळी मागील तीन वर्षात काही तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दिली नसून, निधी पडून असल्याचे सदस्यांनी बैठकीमध्ये निदर्शनास आणून, याची सखोल चौकशी करून त्वरीत शिष्यवृत्तीचे वाटप करावे, अशी मागणी बुट्टेपाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली. त्यावेळी येत्या पंधरा दिवसात त्यावर कार्यवाही करू, असे आश्‍वासन मांढरे यांनी दिले.

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 29) स्थायी समिती बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांसह उपाध्यक्ष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ, बारामती आणि इंदापूर भागातील आदिवासी मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीवरून जिल्हा आणि तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला.

अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. त्यानुसार खेड, जुन्नर, मावळ, बारामती, इंदापूर यासह पिंपरी-चिंचवड मिळून एकूण 2 कोटी 45 लाख 95 हजार इतका निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये खेड, बारामती, इंदापूर या तालुक्‍यातील शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. मात्र, जुन्नर आणि मावळ तालुक्‍यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले नाही. त्याला दोषी कोण, असा प्रश्‍न शरद बुट्टे पाटील यांनी उपस्थित करत, मागील वर्षातील 1 कोटी 61 लाख एवढ्या निधीचे अद्याप वाटप झाले नाही. तर, 2015-16 मधील 33 लाखांचा निधी पडून आहे. विशेष म्हणजे हा निधी परत शासनाकडे गेला होता. परंतु, त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निधी जिल्हा परिषदेला परत दिला. त्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये गांभीर्य नसून, मुख्यालयातील शिक्षण विभागाचे अधिकारी आणि तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. या भोंगळ्या कारभारामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत राहत असल्याचे बुट्टे पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेना गटनेत्या आशा बुचके आणि सदस्य रणजीत शिवतरे यांनीही विषय गंभीर असून, संबधित अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली.

शिष्यवृत्ती वाटपाबाबतचा प्रश्‍न गंभीर असून, याबाबत जबाबदार असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांची तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येईल.
-विश्‍वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)