शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

पुणे, दि.6 – राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून इयत्ता पाचवीच्या निकालाची टक्‍केवारी 22.97 आहे; तर आठवीच्या निकालाची टक्‍केवारी 12.57 आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका लवकरच दिल्या जाणार आहेत. अंतरिम निकाल हा 22 जून रोजी जाहीर झाला होता; तर अंतिम निकाल 6 ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. याबाबची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्‍त सुखदेव डेरे यांनी दिली.
राज्यात 18 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीसाठी 4 लाख 72 हजार 610 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 लाख 08 हजार 560 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले असून 16 हजार 593 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे; तर इयत्ता आठवीसाठी 3 लाख 58 हजार 848 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 45 हजार 103 विद्यार्थी पात्र ठरले आहेत आणि 13 हजार 759 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत.
दरम्यान, अंतरिम निकाल लागल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करून अंतिम निकाल लावण्यात आला असल्याचे डेरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे या महिनाअखेर शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांनी अनधिकृत शाळांमधून परीक्षा दिली असेल त्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत प्रवेश दिला नसल्याचेही डेरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)