शिव थापा, मेरी कोम उपान्त्य फेरीत दाखल

नवी दिल्ली – शिव थापा (60 किलो), मेरी कोम (49 किलो) आणि एल. सरिता देवी (60 किलो) यांनी मंगळवारी प्रतिस्पर्धींवर विजय मिळवित इंडिया ओपन बॉक्‍सिंग स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय मुष्टियोद्धांनी आज उत्कृष्ट कामगिरी करत पदक मिळविण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेता शिव थापा (60 किलो) आणि उझ्बेकिस्तानच्या शेरबेक राखमातुलीव यांच्यातील लढत चुरशीची ठरली. दोघा प्रतिस्पर्धींनी सुरुवीतीचे तीन मिनीटे सावध सुरुवात केली. त्यानंतर शिवने शेवटच्या तीन मिनिटांत आक्रमक ठोसे लगावित शेरबेकचे आव्हान संपुष्टात आणत आगेकूच केली. उपान्त्य फेरीत त्याचा सामना मनीष कौशिकशी होणार आहे.

बाराव्या मानांकित आणि आशियाई विजेती मेरी कोम हिने प्रतिस्पर्धी के. बिना देवीला एकतर्फी सामन्यात पराभूत करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. मणिपूरच्या 35 वर्षीय मेरी कोमने हा सामना 5-0 असा गुण फरकाने जिंकला. महिला गटातील अन्य गटात सरिता देवीने (60 किलो) थायलंडच्या पीमविलाई लाओपीमचा 4-1 असा पराभव केला असून तिचा सामना आता भारताच्याच प्रियंका चौधरीशी होणार आहे. प्रियंकाने इंडोनेशियाच्या हुसवातुन हसनबायचे आव्हान 5-0 असे संपुष्टात आणले. याशिवाय भारताच्या श्‍याम कुमार (49 किलो), सतिश कुमार (91 किलो) आणि अंकुश दहिया (60 किलो) यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)