शिवाजी महाराज हे लोकशाहीचे प्रणेते!

राजेंद्र घावटे : महात्मा गांधी व्याख्यान माला
पिंपरी, (प्रतिनिधी) – जगामध्ये इतरत्र सरंजामशाही, राजेशाही, गुलामगिरी असताना शिवरायांनी रयतेचे हित जोपासून रयतेचे राज्य निर्माण केले. स्वत्व, स्वाभिमान जोपासून जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. समाज मनातील मरगळ झटकून अठरा पगड जातींना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. जगामध्ये शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचे लोक कल्याणकारी राज्य स्थापन करणारे छ. शिवाजी महाराज हे लोकशाही संकल्पनेचे प्रणेते आहेत. इतिहासाचे प्रवाह शिवकाळात बदलले गेले. भारत वर्षाला अखंड मार्गदर्शन करण्याची प्रेरणा शिवचरित्रात आहे, म्हणूनच शिवराय युग प्रवर्तक ठरतात, असे प्रतिपादन शिव व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.

पिंपरीतील मोरवाडी सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या महात्मा गांधी व्याख्यान मालेमध्ये युग प्रवर्तक छत्रपती शिवराय विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर मंगला कदम, राष्ट्रवादी युवती संघटीका कविता खराडे, डॉ. महावीर पांढरे, माधव कोडापे, उल्हास झिरपे, पी. एन. भोसले आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष बी. आर. माडगुळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

राजेंद्र घावटे म्हणाले, आदर्श राज्य कारभार कसा असावा, याचा वस्तुपाठ म्हणून शिव चरित्राकडे पाहता येईल. अठरा पगड जातींच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. शेती आणि शेतकरी यांच्यासाठी शिव काळात विशेष कार्य केले. आयतोबांच्या जमिनी घेवून त्या सामान्य शेतकऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांचे शोषण करणारी जमीनदारी बंद करून शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली. महाराजांनी जमिनीचे सात-बारा तयार केले. प्रतवारीनुसार शेतसारा, जल संसाधन, शून्य टक्के व्याज दराने कर्ज, आर्थिक मदत आदी योजनांमुळे शिव काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या.

महिलांचा योग्य आदर आणि सन्मान राखला जात असे, भ्रष्टाचाऱ्यांना कठोर शासन करणारा कर्तव्य कठोर शासक, गनिमी काव्याचा वापर करणारा चतुर सेनानी, अद्वितीय योद्धा, जमिनीचा सात-बारा प्रथम नोंदवणारा आणि शून्य व्याज दराने कर्ज देणारा शेतकऱ्यांचा तारणहार, वतनदारी ऐवजी वेतनदारी निर्माण करणारा जगातील पहिला प्रशासक आणि अंधश्रद्धा न मानणारा द्रष्टा नेता असे अनेक पैलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्‍तीमत्त्वात होते. दूरदर्शी नेतृत्वामुळे जागतीक स्तरावर नेपोलिअन, जुलियस सीझर, सिकंदर यांच्याशी तुलना केली जाते. परंतु, स्वराज्य संकल्पना आणि व्यवस्था महाराजांनंतर सुरू राहिली. त्यामुळे त्यांचे महत्व अधोरेखित होते. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, प्रबोधनकार ठाकरे अशा अनेक विभूतींना शिव चरित्रातून प्रेरणा मिळाली. देशातले पहिले खडे सैन्य व जगातील पहिले आरमार उभे केले. जलदुर्ग उभारले. अलौकिक कार्यामुळे शिवाजी महाराज रयतेचे जाणते राजे होते, असे सांगून घावटे यांनी शिव चरित्रातील अनेक प्रसंग आणि आजची स्थिती यावर प्रकाश टाकला.

यशवंत लिमये यांनी सूत्रसंचालन केले. अशोक मोरे यांनी आभार मानले. माजी महापौर मंगला कदम यांनी वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)