शिवाजीरावांचं अजब तर्कशास्त्र!

कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ. “राष्ट्रवादी कॉंग्रेस जर अरुण जगताप यांना उमेदवारी देत असेल, तर मी राजीनामा देऊन त्यांचा प्रचार करील.’-इति शिवाजीराव

डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ. “पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी भाजपत यावे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसमध्येच राहावे.’-इति शिवाजीराव.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुद्दाम दोन वेगवेगळ्या ठिकाणची भाषणं दिली. ही दोन्ही भाषणं भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची आहेत. ते स्वतः च अंगाला तेल लावणारा पैलवान म्हणतात. अंगाला तेल लावलं, तरी प्रत्येक वेळी सुटता येत नसतं, हे चांगल्या चांगल्या पैलवानांना माहीत असतं. राजकीय आखाड्यात तर तर्कसंगत न बोलणाऱ्याची कशात गणना होते, हे वेगळं सांगायला नको. मुळात शिवाजीराव भाजपचे आमदार. चाणक्‍यचा अहवाल लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या खासदारांची आणि आमदारांची काळजी करायला हवी. इतर पक्षांच्या राजकारणात त्यांनी नाक खुपसायचं खरं तर काहीच कारण नाही. राजकारणात सल्ला देण्याइतकं त्यांचं वय आणि अनुभव असला, तरी इतर राजकीय पक्षांनी त्यांची सल्लागार म्हणून अजून तरी नियुक्ती केलेली नाही. इतर राजकीय पक्षांवर टीाक करण्याचा त्यांना जरूर अधिकार आहे; परंतु कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला नाही, हे सांगण्याचा त्यांना कितपत अधिकार आहे, हा प्रश्‍नच आहे. किंबहुना भाजपतसुद्धा लोकसभेची किंवा विधानसभेची उमेदवारी कुणाला द्यावी आणि कुणाला देऊ नये, हे त्यांचं ऐकत असतील, यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. तसं असतं, तर त्यांचा मतदारसंघ नगर शहराला लागून असतानाही नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांना अलिप्त ठेवलं नसतं. अर्थात शिवाजीरावांनी त्याअगोदरच नगरमधील भाजपच्या राजकारणापासून बाजूला राहण्याचं ठरविलं होतं. ते पक्षहितासाठी किंवा कुणाच्या सांगण्यावरून नाही, तर “सोधा’ राजकारणासाठी हे वेगळं सांगायला नको.
नगर लोकसभा मतदारसंघातून दिलीप गांधी हे भाजपचे खासदार आहेत. ते तीनदा या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. या वेळी ते पुन्हा इच्छुक आहेत. त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. शिवाजीराव हे ही भाजपचेच. त्यामुळं त्यांनी खा. गांधी यांच्यासाठी काम करायला हवं. भाजपनं उमेदवारीत बदल केला, तर त्याचं काम शिवाजीरावांनी करणं अपेक्षित आहे. राजकारणात कधी कधी बोलून जे होत नसतं, ते पडद्याआड राहून करावं लागतं, हे इतकी वर्षे राजकारणात घालविलेल्या शिवाजीरावांना माहीत नसेल, यावर शेंबडं पोरगंही विश्‍वास ठेवणार नाही. नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार असताना शिवाजीराव मात्र कॉंग्रेसच्या डॉ. सुजय विखे यांना भाजपत येऊन लोकसभेची निवडणूक लढविण्याची ऑफर देतात, हे पक्षशिस्तीत कुठं बसतं, हे भाजपाई जाणोत. भाजपनं शिवाजीरावांवर अन्य पक्षीय नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याची जबाबदारी दिल्याचं ही कुठं वाचनात आलेलं नाही. त्यातही सुजय विखे यांना कॉंग्रेस सोडून भाजपत यायचं निमंत्रण द्यायचं आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांना मात्र कॉंग्रेसमध्येच राहायला सांगायचं. यामागचं गणित काय? केंद्रात भाजपचं सरकार येईल, असा विश्‍वास शिवाजीरावांना वाटतो आणि राज्यात मात्र भाजपचं सरकार येणार नाही, असं त्यांना वाटतं का? राधाकृष्ण विखे यांना भाजपत आणलं आणि ते निवडून आले, तर आपली मंत्रिपदाची संधी हुकेल, ही भीती तर त्यांच्या मनात नाही ना? त्यामुळं तर राधाकृष्ण विखे यांना कॉंग्रेसमध्ये राहण्याचा सल्ला शिवाजीरावांनी दिला असेल. विखे घराण्याचा “थिंक टॅंक’ आहे; परंतु त्यांनी आतापर्यंत कुणा राजकीय सल्लागाराची आतापर्यंत नेमणूक केल्याचं ऐकिवात नाही. उलट, विखे यांच्या सल्लयानं आणि मदतीनं तर शिवाजीराव विधानसभेची पहिली निवडणूक जिंकले होते, याचा विसर त्यांना इतक्‍या लवकर का पडावा?
बाप एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात ही उदाहरणं राज्याच्या, देशाच्या राजकारणात भरपूर आहेत. नगर जिल्ह्यातही तशी ती आहेत; परंतु मुलगा वेगळ्या पक्षात असला, तरी वडिलांचं धृतराष्ट्रप्रेम पक्षनिष्ठेवर मात करतं, हे ही नगर जिल्ह्यानं अनुभवलं आहे. शंकरराव काळे कॉंग्रेसमध्ये आणि अशोक काळे शिवसेनेचे उमेदवार. शंकरराव उघड प्रचारात कधी दिसले नाहीत; परंतु कारखान्यावर बसून कोपरगाव तालुक्‍यातील लोकांना दूरध्वनी करून त्यांनी भावनिक आवाहन केलं होतंच. भाऊसाहेब थोरात सच्चे कॉंग्रेस नेते. बाळासाहेबांनी 1985 ची पहिली निवडणूक बंडखोरी करून लढविली, तेव्हा भाऊसाहेबांनी शकुंतला थोरात या कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं असेल, यावर कोण विश्‍वास ठेवील? राजेंद्र नागवडे भाजपचे उमेदवार आणि शिवाजीराव नागवडे कॉंग्रेसचे नेते. तरीही मुलाच्या प्रचारसभेसाठी ते उपस्थित होतेच ना? शंकरराव कोल्हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सून स्नेहलता भाजपच्या उमेदवार. शंकररावांची त्या वेळी काय स्थिती झाली होती, हे वेगळं सांगायला नको. बाळासाहेब विखे शिवसेनेत आणि राधाकृष्ण विखे कॉंग्रेसमध्ये असं काही काळ होतंच. त्यामुळं कदाचित कुणाला शिवाजीरावांच्या विधानाबद्दल आश्‍चर्य वाटणार नाही. प्रश्‍न असा आहे, की शिवाजीरावांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार ठरविण्याचा अधिकार आहे, की नाही हा. आता तर डॉ. सुजय यांनी कुठं राहावं, हे ही शिवाजीराव सांगायला लागले आहेत.
नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्यामुळं आणि तो न सोडण्यावर राष्ट्रवादी ठाम असल्यामुळं शिवाजीरावांनी डॉ. सुजय यांना भाजपत येण्याचा सल्ला तर दिला नाही ना? कॉंग्रेसला हा मतदारसंघ मिळणार नाही आणि समजा मिळाला, तर कॉंग्रेसची उमेदवारी घेऊन सुजय निवडून येणार नाहीत, असं तर त्यांना वाटत नाही ना? राष्ट्रवादीनं आमदार अरुण जगताप यांची उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. अरुणकाका हे शिवाजीरावांचे व्याही. त्यामुळं त्यांना व्याहीप्रेम असणं स्वाभावीक. त्यासाठी ते भाजपचाही त्याग करायला तयार आहेत. त्यातून त्यांची “पक्षनिष्ठा’ (!) ही कळते. जगताप यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतरही शिवाजीराव राष्ट्रवादीची खिल्ली उडविताना अरुण जगताप यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास आपण पक्षाचा राजीनामा देऊन जगताप यांच्या प्रचारात उतरू, असं जाहीर केलं. खरेंतर जगताप यांची उमेदवारी राष्ट्रवादीनं या महिन्याच्या सुरुवातीलाच जाहीर केलेली. त्यामुळं शिवाजीरावांनी आतापासूनच जगताप यांचा प्रचार सुरू करायला हवा होता; परंतु त्यांचा राष्ट्रवादीवर विश्‍वास नाही. एकीकडं व्याह्याला उमेदवारी मिळाली, तर त्यांच्यासाठी काम करण्याची ग्वाही द्यायची आणि दुसरीकडं व्याह्यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. सुजय विखे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा सल्ला द्यायचा. शिवाजीरावांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी विखे यांची मदत लागते. विखे यांचे कार्यकर्तेही मित्रपक्षाच्या उमेदवाराऐवजी उघडउघड शिवाजीरावांच्या दावणीला येतात. मतदारसंघनिहाय वेगवेगळी भूमिका घेण्याच्या सवयीमुळं तर योग्यता असूनही विखे कुटुंबाला राज्याचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. त्यासाठी शिवाजीरावांसारखे त्यांचे अन्य पक्षातले मित्रही जबाबदार आहेत. शिवाजीराव नेमके कुणाचे, हा प्रश्‍न भल्याभल्यांना सुटलेला नाही. अरुणकाकांचा तरी त्यांच्यावर कितपत विश्‍वास असेल, हे तेच जाणोत. शिवाजीरावांची नगर तालुक्‍यातून मदत मिळावी, यासाठी दुसऱ्या पक्षात असले, तरी त्यांना कुकडीच्या गळीत हंगामाला आ. राहुल जगताप बोलवितात आणि स्वतः ची अडचण करून घेतात. खरं तर शिवाजीरावांच्या वक्तव्यामुळं अनेकदा अनेकांची कोंडी होते. खा. गांधी यांनीही त्यांना मागच्या महिन्यात झालेल्या एका समारंभात कोपरापासून हात जोडले होते. ग्रामीण ढंगात बोलणारा हा नेता लालूप्रसाद यादव यांच्यासारखा चाणाक्ष आहे. स्वहित साधण्यासाठी शिवाजीराव काहीही बोलून संभ्रम निर्माण करू शकतात. आताची त्यांची वक्तव्यं त्याच परंपरेतून आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)