शिवाजीनगर बसस्थानक स्थलांतरीत होणार

मेट्रो हब, वाहतूक कोंडीमुळे महामंडळाचा निर्णय : जानेवारीत अंमलबजावणी

पुणे – शिवाजीनगर बसस्थानकाच्या परिसरात मेट्रोचे होणारे हब आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो आणि महापालिका प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाचे बसस्थानक तातडीने हलविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने त्याबाबतचा अहवाल मागवून घेतला आहे. त्यानुसार येत्या जानेवारी महिन्यातच त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शहरातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन ही एसटी महामंडळाची महत्त्वाची बसस्थानके शहराच्या मध्यवस्तीत आहेत. या ठिकाणाहून सुटणाऱ्या आणि या स्थानकावर येणाऱ्या बसेसची संख्या सर्वाधिक असल्याने ही बसस्थानके हलविण्याचा आणि त्यानुसार त्यांचे विभाजन करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने 10 वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, त्याला मुहूर्त मिळालेला नव्हता. अखेर पंधरा दिवसांपूर्वी शहर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सर्व बसस्थानके शहराच्या बाहेर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्थलांतरास किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल असेही महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यासंदर्भातील हालचाली काहीशा मंदावल्या होत्या.

शिवाजीनगर बसस्थानकाच्या परिसरातच मेट्रोचे हब होणार असल्याने किमान शिवाजीनगर बसस्थानकाचे तातडीने स्थलांतर व्हावे, असा प्रस्ताव पुणे मेट्रो आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने महामंडळाला देण्यात आला. त्यासंदर्भात महामंडळाचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पहिल्या टप्प्यात शिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलातंर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी महामंडळाला जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाची जागा देण्यात येणार आहे. या जागेचा ताबा येत्या आठवड्यात महामंडळाला देण्यात येणार आहे. या जागेचा ताबा महामंडळाला मिळाल्यानंतर याठिकाणी तातडीने बसस्थानकाचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

निधीचा प्रश्‍न अद्याप गुलदस्त्यातच!
शिवाजीनगर बसस्थानक हे खूप वर्षांपूर्वीचे असून ही जागाही मोठी आहे. तरीही गाड्या आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे ही जागाही आता अपुरी पडू लागली आहे. हे वास्तव असले तरी, महामंडळाच्या वतीने याठिकाणी प्रवासी आणि प्रशासनासाठीही पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या बसस्थानकाचे स्थलांतर आणि विभाजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आवश्‍यक आहे. महामंडळाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हा खर्च परवडणारा नाही, ही बाब लक्षात घेऊन हा निधी मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येइल, असेही देओल यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
65 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
3 :heart_eyes:
2 :blush:
109 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)