शिवाजीनगर न्यायालयात कटघरे मिळतील का?

– विजयकुमार कुलकर्णी

पुणे – “जो भी कहना है, कटघरे मे आकर कहो’ हा हिंदी चित्रपटातील गाजलेला डायलॉग. मात्र, येथील शिवाजीनगर न्यायालयातील काही न्यायालयांत कटघरांचा नियम लागू होत नाही. काही न्यायालयात कटघरेच नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. स्वातंत्र्याच्या तब्बल 70 वर्षांनंतर न्यायदेवतेच्या मंदिरात कटघरांसारखी सुविधा उपलब्ध नसणे अतिशय दुर्दैवी आहे.

न्यायालयाच्या रचनेनुसार प्रत्येक न्यायालयात “साक्षीदार’ आणि “संशयित आरोपीं’ यांची दोन कटघरे असणे आवश्‍यक आहे. त्याप्रमाणे शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात काही न्यायालयांमध्ये, अशी दोन कटघरे आहेत. काही न्यायालयामध्ये एकच कटघरा आहे. तर काही न्यायालयामध्ये अद्यापही एकही कटघरा नसल्याचे दिसून येते. न्यायाधीशांचे डायस उंचीवर असणे आवश्‍यक आहे. मात्र, काही न्यायालयात साध्या खुर्च्या टाकून डायस तयार करण्यात आले आहेत. न्यायालयात सुनावणीवेळी न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये ठराविक अंतर आवश्‍यक असते. येथील काही न्यायालयात असे अंतर नसल्याचे दिसून येते. परिणामी, न्यायालयातील “डेकोरिंयम मेंटेन’ होत नाही. काही ठिकाणी स्टेनो आणि क्‍लार्कला बसण्यास जागा नाही. अनेक न्यायालयांमध्ये फाईल्सची संख्या प्रचंड वाढली आहे. न्यायालयात कपाटावर फाईल्स ठेवल्याचे दिसून येते. याबरोबरच न्यायालयाच्या आवारात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. येथे कूलर बसविण्यात आले आहेत. परंतु, हे अतिशय अस्वच्छ असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी पाणपोई आहेत. मात्र, अनेकवेळा येथे पाणी नसते. त्यामुळे पक्षकार, वकिलांना पाणी पिण्यासाठी कॅंटीनला जावे लागते.

मुळातच कॅंटीनचे दर अवाजवी आहेत. पक्षकारांना बाहेरून पदार्थ न्यायालयात नेण्याची मुभा नाही. त्यामुळे नाईलाजाने पक्षकारांना कॅंटीनला जावेच लागते. न्यायालयातील स्वच्छतागृहे नेहमी अस्वच्छ असतात. महिलांसाठी तर पुरेशी स्वच्छतागृहेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे महिलांची गैरसोय होते. पक्षकारांना बसण्यासाठी पुरेशी बाके उपलब्ध नाहीत. त्यानंतर सर्वात मोठा म्हणजे पार्किंगचा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. पक्षकारांना न्यायालयाच्या आवारात गाडी नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे न्यायालयाच्या बाहेरच त्यांना गाड्या पार्क कराव्या लागतात. तेथून गाडी चोरीला गेल्याची उदाहरणे आहेत. तर, दुसरीकडे वकिलांना न्यायालयात गाडी पार्किंग करण्यास परवानगी आहे. मात्र, वकिलांना गाडी लावण्यास जागा अपुरी पडू लागली आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या गेटजवळ कौटुंबिक न्यायालय सुरू झाले आहे. तेथील पार्किंग अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे तेथे प्रॅक्‍टीस करणारे वकिलही शिवाजीनगर न्यायालयात गाडी पार्क करू लागले आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्याही निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यायालयातील सर्व समस्या कधी सुटणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)