शिवस्मारकाच्या पायभरणीच्या कामाला गालबोट; अरबी समुद्रात बोट उलटली 

अरबी समुद्रात बोट उलटून 23 जण बचावले 

शिवसंग्रामच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाच्या पायाभरणीच्या कामाला गालबोट लागले आहे. महाराजांच्या स्मारकाच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरूवात होणार होती. या कामाचे साक्षीदार होण्यासाठी समुद्रात गेलेल्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्याच्या बोटीला अपघात झाला. वेगाने पळणाऱ्या बोटीला समुद्राखालील खडकाची धडक बसली आणि काही क्षणार्धात बोटीत पाणी शिरले. पाणी शिरल्याचे समजताच सर्वांनी देवाचा धावा सुरु केला. पण काही मिनिटातच ही बोट पाण्यात बुडाली. सुदैवाने जवळून जाणाऱ्या एका बोटीने 23 जणांना वाचवले. मात्र शिवसंग्राम संघटनेचा एका कार्यकर्त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना संध्याकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास घडली.

माझा मृत्यू मी डोळ्याने पाहणार होतो 
ज्या बोटीला अपघात झाला, त्यावेळी शिवसंग्राम संघटनेचे सर्वाधिक कार्यकर्ते या बोटीवर होते. हा अपघात मी माझ्या डोळ्याने पाहिला. बोट बुडत असताना माझ्यावर मृत्यू ओढावला होता. बोटीत दोन पूैट पाणी शिरले होते. मी आता मरणार या भीतीने माझ्या पत्नीला याची कल्पना दिली. फोनवरून तिच्याशी शेवटचा संपर्वै साधला आणि तिला या सर्व प्रसंगाची कल्पना दिली. हा प्रसंग ऐवूैन माझ्याही पत्नीला रडू कोसळले. पण नशिब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, अशी माहिती बीडचा शिवसंग्रामचा कार्यकर्ता बाळासाहेब जटाळ यांनी दिली. 

मुंबई जवळच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाचे 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले होते. त्यानंतरही महाराजांच्या स्मारकाच्या कामाला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर दोन वर्षांनंतर म्हणजे बुधवार, 24 ऑक्‍टोबर रोजी स्मारकाच्या प्रत्यक्ष पायाभरणीच्या कामाला सुरुवात होणार होती.

पायाभरणीच्या शुभारंभासाठी पौरोहित्यासाठी सोबत पुरोहित, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, मुख्य सचिव डी. के. जैन, भाजपाचे आमदार राज पुरोहित, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि शिवसंग्रमाचे कार्यकर्ते अरबी समुद्रातीत स्मारकाच्या प्रत्यक्ष ठिकाणी निघाले. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून बोटीतून हा प्रवास सुरु झाला. दोन मोठ्या बोटी व दोन छोट्या वेगाने धावणाऱ्या बोटी होत्या.

वेगाने धावणाऱ्या एका बोटीत शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि काही सरकारी अधिकारी असे मिळून 24 जण होते. या बोटीत प्रमाणापेक्षाही जास्त व्यक्ति शिरले होते. त्यांच्या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. या बोटीचा चालक वेगाने बोट पळवत असताना गेटवे ऑफ इंडियापासून काही अंतरावर या बोटीला अपघात झाला. या बोटीच्या नाविकाला गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या दिपस्तंभाजवळील खडकाळ भागाचा अंदाज आला नाही. तिथेच घात झाला.
खडकावर आदळताच बोट पुढे काही अंतरावर जाऊन बंद पडली.

बोट वेगाने असल्याने बोटीच्या तळाचा भाग फुटला आणि बोटीत वेगाने पाणी शिरले. काहींनी बोटीतील पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. पण बोट पाण्याखाली बुडणार असल्याचे समजताच काहींनी पोलीस, नेव्ही व कोस्टगार्डला फोन करून अपघाताची कल्पना दिली. या बोटीवर असणारे महसूल मंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांनी शेकापचे आमदार जयंत पाटील यांना फोन करून मदतीची मागणी केली.

बोटीवरील सर्वांचा आराडाओरडा सुरु झाला, तर काहींनी देवाचा धावा सुरु केला. काही जणांनी अगोदरच पाण्यात उड्या मारल्या. बघताबघता क्षणार्धात ही अपघातग्रस्त बोट पाण्यात बुडाली. सुदैवाने या अपघातग्रस्त बोटीच्या जवळूनच जाणाऱ्या एका बोटीने या सर्वांना वाचवले. पण दुर्दैवाने शिवसंग्रामचा कार्यकर्ता सिद्धेश पवार हा बेपत्ता झाला. पाण्यात बुडाल्याने काहींच्या नाकातोंडात पाणी गेले. त्यामुळे तीन-चार व्यक्ति बेशुद्ध झाले. या सर्वांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नौदल, कोस्टगार्ड मदतीला धावले 
आयएनएस शिक्रा या नौदलाच्या बोटीवरून दोन हेलिकॉप्टरने शोध मोहिम हाती घेतली. कोस्टगार्डही मदतीला धावले. नौदलाच्या पाणबुड्यांनी पाण्यात शोध सुरु केला. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर रात्री 8 च्या सुमारास सिद्धेशचा मृतदेह बुडालेल्या बोटीत सापडला. त्यानंतर नौदलाने शोधमोहिम थांबवली.

अपघाताची चौकशी करणार 
अरबी समुद्रात बोटीच्या अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे धाव घेतली. अपघातातील सर्वजण बचावले असून एक जण बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा अपघात कसा झाला, नेमके काय घडले, याची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)