शिवसेनेत गटबाजीचे “फटकारे’

– अधिक दिवे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेतील गटबाजी आणि अंतर्गत धुसफूस “ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली. खासदार श्रीरंग बारणे आणि महापालिकेतील गटनेता राहुल कलाटे असे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले असून, दोघांच्या समर्थकांनी स्वतंत्रपणे चित्रपटाच्या स्वागत कार्यक्रमाचे नियोजन केले.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सुमारे 2 हजार चित्रपटगृहांत “ठाकरे’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्येही शिवसेनेच्या वतीने चित्रपटाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. वाजत, गाजत, ढोल ताशांच्या गजरात अन्‌ तुतारीच्या निनादात स्वागत झाले. शिवसेना, विभाग प्रमुख, आजी माजी पदाधिकाऱ्यांनी तिकीटांचे “बूकिंग’ केले होते. त्यामुळे सकाळपासूनच चित्रपटगृहांसमोर भगवे ध्वज घेऊन कार्यकर्ते जमा होऊ लागले होते. मात्र, शहर सेनेमध्ये दोन गट तयार झालेले पहायला मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वतीने शहर प्रमुख योगेश बाबर आणि जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी शहरातील निवडक व्यक्‍तींना स्वत: भेटून तिकीट वाटप केले. त्या दरम्यान खासदार बारणे यांनी लिहिलेले “मी अनुभवलेली संसद’ आणि “वैभवशाली मावळ’ अशा दोन पुस्तकांचीही भेट देण्यात आली. चिंचवड येथील कार्निवल सिनेमा बिग बझार येथे सव्वा बाराच्या खेळाला बहुचर्चित ठाकरे चित्रपटाचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहर संघटिका ऊर्मिला काळभोर, सरिता साने, शिवसेना सल्लागार मधुकर बाबर, बाळासाहेब वाल्हेकर, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दुसरीकडे, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी पिंपळे सौदागर येथील रॉयल सिनेमागृहात चित्रपटाचे सकाळी अकराचे सर्वच “शो’ “बूक’ केले होते. यावेळी शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, नगरसेविका मिनल यादव, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, नगरसेवक अमित गावडे, सचिन भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वास्तविक, चिंचवड येथील कार्निवल सिनेमा बिग बझार येथे सव्वा बाराच्या “शो’साठी खासदार बारणे, आमदार चाबुकस्वार, शहरप्रमुख बाबर यांनी नियोजन केले. त्याठिकाणी गटनेता कलाटे आणि शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी जाणे टाळले होते. तसेच, पिंपरी सौदागर येथील रायल सिनेमागृहातील सकाळी 11 वाजता “शो’ असतानाही या कार्यक्रमास खासदार बारणे आणि सहकाऱ्यांनी जाणे टाळले होते. त्यामुळे “ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने शहरात बारणे-कलाटे यांच्यातील राजकीय दरीबाबत चर्चा होती. त्यातच गटनेता कलाटे यांनी चित्रपट संपल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी साकारलेल्या “फटकारे’ पुस्तकाची भेट दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी काढलेल्या निवडक व्यंगचित्रांचा संग्रह त्यामध्ये आहे. त्यामुळे “मी अनुभवलेली संसद’ या पुस्तक वाटपाला आव्हान म्हणून “फटकारे’ पुस्तकाचे वाटप करण्यात आले, अशी चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.

कारण, बारणे आणि कलाटे यांच्या पुढाकाराने झालेले दोन्ही कार्यक्रम दिमाखात झाले. पण, दोन्ही कार्यक्रम वेगवेगळे झाले होते. एकत्रितपणे चित्रपटाचे स्वागत केले असते, तर पक्षाची ताकद मोठी दिसली असती, अशी खंत निष्ठावंत शिवसैनिक व्यक्‍त करीत आहेत.

…अशी आहे वादाची पार्श्‍वभूमी!
शिवसेना खासदार बारणे आणि गटनेता कलाटे यांच्यात महापालिका निवडणुकीपूर्वीच धुसफूस सुरू झाली होती. कलाटे यांच्याकडे शहराध्यक्षपद असताना निवडणुकीनंतर शहराध्यक्षपद योगेश बाबर यांना देण्यात आले. गटनेतेपदी निवड झाली म्हणून मीच शहराध्यक्षपद नको, असे सांगितल्याचे कलाटे त्यावेळी सांगत होते. मात्र, योगेश बाबर यांना शहराध्यक्षपदी संधी मिळावी. त्यासाठी बारणे यांनी पुढाकार घेतला होता, अशी चर्चा आहे. त्यानंतर “स्मार्ट सिटी’ आणि वृक्ष संवर्धन समितीवर नगरसेवकांची नियुक्‍ती करण्यावरुन बारणे आणि कलाटे यांच्यात वादाची ठिणगी पडली. कलाटे यांनी केलेल्या शिफारसी डावलून बारणे यांनी सूचवलेल्या नगरसेवकांची निवड केल्याचे बोलले जाते. त्यात भर म्हणून पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाकयुद्ध सुरू असतानाही कलाटे यांनी पार्थ पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे बारणे-कलाटे वाद आणखी तीव्र होत असल्याचे दिसून आले. तसेच, शिवसेनेचे महापालिकेतील पाच नगरसेवक कलाटे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. कारण, या पाचही नगरसेवकांनी खासदार बारणे उपस्थित असलेल्या चिंचवडमधील कार्यक्रमाला शुक्रवारी हजेरी लावली नाही. त्यामुळे राजकीय चर्चा रंगली होती.

पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालण्याची गरज
खासदार बारणे मावळ लोकसभा मतदार संघातून पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. तसेच, गटनेता कलाटे चिंचवडमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या जाहिरातींमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे “ब्रॅंडिंग’ करण्यात आले होते. तसेच, चिंचवडे हे खासदार बारणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे चिंचवडे यांच्या विधानसभा तिकीटासाठी खासदार बारणे प्रयत्न करतील, असे समीकरण मांडले जाते. दुसरीकडे, शिवसेनेतील मातब्बर नेत्यांच्या संपर्कात असलेले कलाटे यांनीही तिकीटासाठी जोरदार “फिल्डिंग’ लावली आहे. तसेच, राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यासंदर्भातील “त्या’ वक्‍तव्यावरुन बारणे आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाही कलाटे यांनी एका कार्यक्रमात पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील हे दोन्ही संभाव्य उमेदवार एकमेकांचे पाय खेचण्याची भूमिका घेतील, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी दोघांमध्ये “समेट’ घडवून आणावा. अन्यथा पक्षालाच फटका बसणार आहे, अशी भूमिका काही जुन्या शिवसैनिकांनी मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)