शिवसेनेच्या सत्तेत मनसेचा गड कायम

झेंडेवाडीच्या सरपंचपदी मनसेच्या सोनाली झेंडे यांची बिनविरोध निवड
गराडे, – पुरंदर तालुक्‍यात राज्य जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेची सत्ता विस्तारली तरी त्यांना झेंडेवाडीचा मनसेचा गड जिंकता आलेला नाही. मनसेचे शेतकरी राज्य प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी या गावावरील पकड सुरवातीपासूनच कायम ठेवली असून यावेळीही सरपंच पदाच्या निवडीत अन्य कोणत्याही पक्षाला शिरकाव करू न देता, मनसेचाच सरपंच करण्यात बाबाराजे यांना यश आले आहे.
दिवे घाटाजवळील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता बाळासाहेब खटाटे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी अन्य पक्षांकडून येथे शिरकाव होण्याची चिन्हे होती. परंतु, या रिक्त झालेल्या सरपंचपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोनाली अविनाश झेंडे यांची बिनविरोध निवड झाली, त्यामुळे झेंडेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तालुक्‍यात शिवसेनेची सत्ता असताना मनसेचे हे यश मोठे मानले जात आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा भुतकर यांनी काम पाहिले. ग्रामसेविका व्ही.डी.भगत, तलाठी सुधीर गिरमे, मदतनीस शब्बीर शेख हे निवडणूक सहाय्यक होते. निवडणुक प्रक्रियेप्रसंगी सकाळी 11 वाजता सरपंच पदासाठी एकच अर्ज आला. दुपारी दोन वाजता निवड जाहीर होऊन सोनाली झेंडे यांची बिनविरोध निवडीची घोषणा मनिषा भूतकर यांनी केली. या वेळी उपसरपंच समीर बाबासाहेब झेंडे, माजी सरपंच संगिता बाळासाहेब खटाटे, ग्रामपंचायत सदस्य मिना महादेव झेंडे आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर विठ्ठल खटाटे, प्रकाश बबन गोरगल, मंगल प्रकाश गोरगल हे तीन ग्रामपंचायत सदस्य गैरहजर होते.
यावेळी मनसेचे शेतकरी राज्य प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते सरपंच सोनाली झेंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे संचालक गंगाराम जगदाळे, दिवे गावच्या सरपंच निता लडकत, गराडेचे उपसरपंच सुनील जगदाळे, हांडेवाडीचे उपसरपंच अशोक न्हावले, गुलाबतात्या झेंडे, पंडीतराव मोडक, सुरेश जगदाळे, पॅनेलप्रमुख बाबुराव गोळे, पांडुरंग झेंडे, अजित गोळे, विठ्ठल झेंडे, बाळकृष्ण खटाटे, अजित गोळे, शंकर झेंडे, महादेव झेंडे, बाळासाहेब खटाटे, भालचंद्र झेंडे, शिवाजी खटाटे, ललिता गोळे, विकास झेंडे, नितीन खटाटे, संभाजी खटाटे, सतिश झेंडे, नारायण झेंडे, अविनाश झेंडे, रामदास लडकत आदींसह झेंडेवाडी, दिवे पंक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्तविक पांडुरंग झेंडे यांनी केले. सुत्रसंचालन बाबुराव गोळे यांनी केले. महादेव झेंडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)