शिवसेनेच्या मंत्र्यांनी आतातरी खिशातील राजीनामे बाहेर काढावेत

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आव्हान
मुंबई – अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लावण्यासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी आता खिशातील राजीनामे बाहेर काढावेत आणि सरकारच्या तोंडावर फेकून द्यावेत, असे आव्हान विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. तर या सरकार विरोधात अंगणवाडी सेविका, शासकीय कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कामगार सर्वच आंदोलन करत आहेत. कारण हे सरकार इंग्रजांपेक्षा जुलूमी आहे, असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या उर्वरीत काळासाठी कोणती रणनीती आखायची यासाठी उद्या विरोधी पक्षनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे उभय विरोधी पक्षनेत्यांनी जाहीर केले. तुटपूंज्या वेतनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावणे हा जनमानसाचा आवाज दाबून दुर्दैवी निर्णय आहे. मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री असताना तेथे विरोध न करता सभागृहात मेस्मा विरोधाचे नाटक करायचे ही जनतेची दिशाभूल आहे, असे विखे-पाटील म्हणाले.

सभागृहात आज अनुदान मागण्यांवर चर्चा होती. कायदा व सुव्यवस्था या विषयावर विरोधी पक्षांचा प्रस्ताव होता. आमचे सदस्य कामकाजात भाग घेत होते. मात्र, सत्तारूढ सदस्यांनीच गोंधळ घातला. आम्हाला बोलूच दिले जात नव्हते. आम्ही मतदान मागितले, ती मागणीही मान्य झाली नाही. मंत्रिमंडळात बसणारे पक्षच गोंधळ करतात हे लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य आहे, असेही विखे-पाटील म्हणाले.

सभागृहात आपल्याला अडचणीत असणारी चर्चा असेल तर सत्तारूढ पक्षांनीच गोंधळ करायचा हे लोकशाहीला घातक आहे. कधी घडले नाहीत असे विचित्र प्रकार आज विधीमंडळात घडू लागले आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)