शिवसेनेच्या “डॅमेज कंट्रोल’साठी राजीनाम्याचे नाटक

राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

मुंबई,  – दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून “डॅमेज कंट्रोल’साठी शिवसेनेने उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक केले, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्यावरील घोटाळ्याच्या आरोपावरून शनिवारी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा फेटाळल्यानंतर विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना शिवसेनेवर टीका केली. विरोधी पक्षांनी पुराव्यांसह आरोप करून सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, त्यास साफ नकार देत यापूर्वीच्या सरकारच्या काळातच गैरव्यवहार झाल्याचे सांगून उद्योग मंत्र्यांनी स्वत:चा केविलवाणा बचाव केला.

उद्योग मंत्र्यांना त्यांच्या विभागात यापूर्वी गैरव्यवहार झाल्याचे माहिती होते, तर तीन वर्ष ते झोपले होते का? शिवसेनेमध्ये नैतिकता असती तर गैरव्यवहार उघडकीस आल्यावर तातडीने उद्योग मंत्र्यांची राजीनामा घेतला असता. परंतु, त्यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कानावर हात ठेवले आणि आता जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आह, असे विखे-पोटील म्हणाले.

मुंबई महापालिका देशातील भ्रष्ट महापालिका म्हणून ओळखली जाते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच त्याबाबत डोळेझाक केली आहे. गेल्या महिन्यात घाटकोपरमध्ये इमारत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेसाठी मुंबई महापालिका व शिवसेना कार्यकर्त्याचा भ्रष्टाचार कारणीभूत होता, असा आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवणारे मलिष्काचे गाणे शिवसेनेला झोंबले होते. कारण त्यात वस्तुस्थिती होती. त्यामुळे शिवसेनेने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुभाष देसाईंची पाठराखण करण्यात काहीच आश्‍चर्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)