शिवसेनेच्या उपनेत्यांना संग्रामचा फोबिया!

आमदार जगताप यांचे राठोड यांचा खोचक प्रत्युत्तर : घोडा मैदान जवळ आल्याचा इशारा

नगर – “स्वार्थी कोण, हे नगरकरांना माहिती आहे. उपनेत्यांचे मंत्रीपद स्वार्थीपणामुळे अकरा महिन्यात गेले. राजकीय करिअरपेक्षा नगर शहराचा विकास महत्त्वाचा आहे. तो करतच आलो आहे, आणि यापुढेही तो तेजीने करत राहणार आहे. त्याचीच धास्ती उपनेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये उठाठेव करत आहे. केडगावप्रकरण हे त्यातील राजकीय सूड आहे. विकासाच्या गप्पा मारणारे उपनेते आणि त्यांचे मंत्र्यांना विकासाच्या मुद्यावर नगर शहर आठवत नाही. राजकीय सूडावेळी मात्र यांचेच पाच-पाच मंत्री नगरमध्ये येऊन बसतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या खुलाशाबाबत या उपनेत्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ही पक्षातंर्गत बाब आहे. राष्ट्रवादीचे वाढते वर्चस्वामुळे त्यांना उठता-बसता-झोपता (फोबिया) संग्रामच दिसतो आहे. शिंगावर घेण्याची भाषा करणाऱ्यांना नगरकरांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. आताही घोडा मैदान जवळच आहे,’ अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावर पलटवार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या खुलाशावर शिवसेनेच्या राठोड यांनी टीकास्त्र सोडले होते. आमदार जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जगताप म्हणाले, “शिवसेना मंत्र्यांनी आमच्या वरीष्ठांकडे पाठिंब्यासाठी मागणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर बोलण्यापूर्वी उपनेते राठोडांनी आत्मपरीक्षण करावे. शिवसेनेकडे कुठलाही विकासाचा अजेंडा नाही. उद्योगमंत्री त्यांचे, परिवहन मंत्री त्यांचेच आहेत. तरीही ते शहर बससेवा सुरू करू शकले नाहीत. राष्ट्रवादीचे संख्याबळ जुळत नसल्याने आम्ही भाजपला पाठिंब्याचा निर्णय घेतला.’ मुळात शिवसेनेच्या नेत्यांना आरोप काय करायचेत, ते त्यांना कळत नाहीत. कधी केडगाव हत्याकांड म्हणतात, तर कधी पैसे घेवून पाठिंबा दिल्याचे म्हणतात. मुळात आमच्या पक्षांतर्गत बाबींवर त्यांनी बोलण्याची गरजच नाही. नगरसेवकांना जे वाटले ते त्यांनी पक्षाकडे मांडले. त्यांना राठोडांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मात्र, राष्ट्रवादीचा विषय आला की ते बेचैन होतात. झोपता-उठता त्यांना मीच दिसतो, असा टोलाही जगताप यांनी मारला.

पक्षाच्या निष्ठेबाबत बोलताना जगताप यांनी उपनेते राठोड यांचे जुने संदर्भ देत चांगलेच चिमटे घेतले. राठोड यांनी यावर बोलूनच नये. नगरच्या शिवसैनिकाला यांनी कधी मोठे होऊ दिले नाही. महापौर निवडणुकीतही बाहेरून आलेल्यांना संधी दिली. निष्ठावान बाजूला राहिल्याचे त्यांचेच नगरसेवक सांगतात. 2008 आणि आता 2018 मध्येही हेच घडले. त्यांनी त्यांची मैत्री कालच बोलून दाखविली. त्यातील साटेलोटे जनतेला कळते. त्यामुळे पक्षनिष्ठा त्यांनी शिकवू नये. यांनी काय काय केले, हे आम्हाला सगळे माहिती आहे. काही गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे. गटनेता संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, गणेश भोसले, विनीत पाउलबुधे, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, कुमार वाकळे, संजय चोपडा आदी यावेळी उपस्थित होते.

पोलिसांच्या अहवालात उपनेत्यांवर गंभीर ठपका
केडगाव हत्याकांड प्रकरण घडले. त्यावेळी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती, तर कदाचित त्या दोघांचे प्राणही वाचले असते. गृहराज्य मंत्री तुमचे, दबाव तुमचाच असतांनाही पोलिसांनी निर्भीडपणे अहवाल सादर केला. त्यात हे उपनेते राजकारणासाठी कोणत्याही पातळीवर जातील, हे स्पष्ट झाले आहे. जनतेसमोरही हे सगळे आले आहे, असा टोलाही आमदार संग्राम जगताप यांनी लगावला.

गिरवलेंवरील आरोप नगरकर विसरलेले नाहीत
कैलास गिरवले यांच्यावर शिवसेनेने कोणत्या थरावर जावून आरोप केलेत, हे जनतेने पाहिले आहे. मागील घटना घडल्यानंतर शिवसेनेचे मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पकडून आणण्यासाठी दबाव टाकत होते. मारहाण करायला भाग पाडत होते, असा आरोपही आमदार जगताप यांनी केला. माजी आमदार दादाभाऊ कळमकर माझ्या अगोदरपासून शरद पवार यांच्याबरोबर आहेत. त्यांच्याविषयी आपण काहीही बोलणार नाही, असे आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले.

…तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ!
भारतीय जनता पक्षाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या नेत्यांनी शहर विकासासाठी निधी देण्याचे कबूल केले आहे. भाजपकडून शहर विकासाबाबत चुकीचे घडल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. पाठिंबा काढून घेऊ. शहर विकासाचे प्रश्‍न न सुटल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनेही करेल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केला. लोकसभेसाठी राष्ट्रवादी भाजपविरोधातच काम करेल, असेही जगताप यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)