शिवसेनेचे रक्तरंजीत निवेदन

खटाव तालुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणी : उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली वडूजमध्ये आंदोलन

वडूज/प्रतिनिधी : खटाव तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करून तालुका दुष्काळी जाहीर करावा ही मागणी करीत या प्रकरणात चालढकलीचे धोरण करणार्‍या प्रशासनाचा निषेध करीत शिवसेनेच्यावतीने रक्ताने निवेदन लिहून आंदोलन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात तालुकाप्रमुख दिनेश देवकर, महिपत डंगारे, अमिन आगा, बाळासाहेब जाधव, शिवाजी शिर्के, बाळकृष्ण सावंत, यशवंत जाधव, अस्लम शिकलगार, संतोष दुबळे, रामभाऊ लावंड, रामभाऊ जगदाळे, बळीराम सुर्यवंशी, संभाजी नलवडे, हंबीरराव मोहिते, संगिता देशमुख, प्रकाश शिंदे, सचिन गवळी, सुभाष घाडगे, रमेश बोडके, महंमद काझी, सुशांत काशीद, मिथून गवळी आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.

खटाव तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करा आदी घोषणा देत शिवसैनिकांनी तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. त्याठिकाणी निवासी नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र प्रशासनातील वरिष्ठांनी येथे येऊन दुष्काळाबाबत भूमिका स्पष्ट करावी या मागणीवर आंदोलक ठाम होते. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. अखेरीस प्रशासनाकडून शिवसैनिकांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत स्वत:च्या रक्ताने खटाव तालुका दुष्काळ जाहीर करा असे निवेदन लिहीले. त्यानंतर त्यांनी थेट तहसिलदार जयश्री आव्हाड यांच्या दालनाकडे धाव घेऊन त्यांच्या दालनाच्या दारावर हे रक्तरंजीत निवेदन चिटकविले.

यावेळी बोलताना प्रताप जाधव म्हणाले, खटाव तालुक्यात भयाण दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाझर तलाव कोरडे पडले आहेत. लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. असे असताना देखील तालुक्याला दुष्काळ यादीतून सलग दोन वेळा डावलले जाते. याबाबत प्रांताधिकारी व तहसिलदार यांचे कमालीचे दुर्लक्ष जाणवते. तसेच तालुक्याला तीन लोक प्रतिनिधी असतानाही त्यांचे याबाबत अद्यापही मौनच आहे. आपण राज्यात सत्तेत असणार्‍या शिवसेनेचे पदाधिकारी आहोत. शिवसेना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कायम बांधील राहीली आहे. त्यामुळे प्रशासनाने येत्या आठ दिवसांत दुष्काळाची भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)