शिवसेनेची निःसंदिग्ध भूमिका कधी? 

शेखर कानेटकर 

तेलगू देशमच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तेव्हा शिवसेनेच्या प्रवक्‍त्यांनी “त्यांनी आमच्यापासून स्फूर्ती घेतली,’ अशी बढाई मारली. पण सेना “जैसे थे’च आहे. तेलगू देशमने मोदी सरकारवर अविश्‍वास ठराव आणला तेव्हा मात्र शिवसेनेने नेहमीप्रमाणे घूमजाव केले. “हा ठराव आणणे अपरिपक्‍वपणाचे आहे. त्याने काही साध्य होणार नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आणि तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, शिवसेनेने आता तरी काही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

“आपला पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर यापुढे युती करणार नाही; लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणेच लढविणार,’ असे शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केले आहे. तरीही शिवसेनेचे मंत्री केंद्र व राज्य सरकारात सत्तेची पदे बिनदिक्कत उपभोगत आहेत. दुसरीकडे “तेलगू देसम’चे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी इशारा दिला; नी लगेच केंद्र सरकारमधील दोन मंत्र्यांनी राजीनामेही देऊन टाकले. पाठोपाठ नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणाही करून टाकली. दोन प्रादेशिक पक्षांच्या कार्यपद्धतीतील हा फरक! शिवसेना गेली दोन-तीन वर्षे पंतप्रधान मोदी व भाजपवर टीकेचा ऊठसूठ भडिमार करीत आहे, राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची भाषा करीत आहे. सेनेचे मंत्री “राजीनामे खिशात ठेवूनच हिंडतो’, असे सांगतात. पण प्रत्यक्षात तोंड वाजवण्याखेरीज काहीच होताना दिसत नाही. तिकडे तेलगू देसमने प्रत्यक्ष कृतीही करून टाकली.

लोकसभेतील संख्याबळ पाहता मोदी सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाचा कोणताच धोका नाही. त्यामुळे या ठरावाने विरोधक एकजुटी व्यतिरिक्त काही साध्य होणार नाही, हे खरे आहे. पण भूमिकेतील सातत्य न राखण्याची परिपक्वता शिवसेनेने याही वेळी दाखविली नाही, असेच म्हणावे लागेल. “स्वबळावर लढण्याची आणि भाजपाशी युती न करण्याची घोषणा करायची, पण सरकारमधील मंत्रिपदे मात्र उपभोगायची, सरकारवर – त्याच्या प्रमुखांवर तोंडसुख घ्यायचे आणि सरकारात रहायचेही,’ असा डबलरोल शिवसेना किती दिवस करणार आहे? यातून त्यांना काय साधायचे आहे? पण शेवटी या “डबल रोल’चा काही ना काही फटका शिवसेनेला बसणार, एवढे निश्‍चित. शिवसेनेला काही केले तरी सत्तेचा मोह सुटत नाही, असा संदेश या “तळ्यात-मळ्यात’च्या भूमिकेतून जातो.

आगामी लोकसभा व विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केल्यावर तरी सेना सत्तेतून बाहेर पडेल व आपला स्वाभिमानी बाणा दाखवेल, असे वाटले होते, परंतु आजपर्यंत तरी तसे झालेले नाही. पुढे होण्याची शक्‍यताही वाटत नाही. “भाजपबरोबर युती करणार नाही’, असा ठराव शिवसेनेने केला असला तरी आम्ही (म्हणजे सेना-भाजप) एकत्रच लढणार आहोत, असे भाजपचे काही ज्येष्ठ नेते ठामपणे सांगत आहेत. “आमचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार आहे’, असे खुद्द मुख्यमंत्री सांगताहेत. शिवाय अविश्‍वास ठरावाबद्दलची सेनेची तटस्थ भूमिका, यामुळे दोघांचा घरोबा भविष्यात चालूच राहणारच, या शक्‍यतेला पुष्टी मिळते.

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना-भाजप युती संपुष्टात आली होती. त्यावेळी शिवसेना स्वबळावरच लढली होती. तरीही अनंत गीते यांना शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्यास सांगितले नाही, वा मोदी यांनीही त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला नाही. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही; पुढेही होणार नाही, असे जाहीर झाले. तरी शिवसेनेचे सर्व मंत्री पदावर सुखनैव बसून आहेत. याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? सर्व काही योजनाबद्धपणे चालू आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक सर्रास सुरू आहे, असेच म्हणावे लागते.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर पक्षात फूट पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कॉंग्रेसमधून मुक्‍त झालेले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वळचणीला आलेले “स्वाभिमानी’ नारायण राणे हेही, “सेनेचे 25-26 आमदार आपल्या संपर्कात आहेत’, असे सांगत असतात. पक्षही फुटेल, सत्तेचीही उब जाणार असेल तर काय फायदा, असा विचार होत असेल आणि म्हणून “आत एक; बाहेर दुसरी’ भूमिका शिवसेना घेणार असेल तर ती त्यांच्या सांगितल्या जाणाऱ्या “बाण्या’शी विसंगत आहे.

निवडणुकीत युती नाही केली, पण निवडणुकीनंतर पुन्हा सहकार्य केले फारसे बिघडत नाही. तो पर्याय खुला असतो. परंतु आतासारखी दोन्ही डगरींवर हात ठेवणारी संदिग्ध भूमिका यात पक्षाचेच नुकसान आहे, असे वाटते. त्यापेक्षा एकच स्पष्ट, निःसंदिग्ध भूमिका घेऊन शिवसेनेने मतदारांना सामोरे जायला हवे. सरकारच्या बाजूने किंवा विरुद्ध अशी ठोस भूमिकाच पक्षाला न्याय मिळवून देईल. मतदारांना झुलवत ठेवण्यात वा द्विधा मनस्थितीत ठेवण्यातून काही साध्य होईल, असे वाटत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)