शिवसेनेकडून पर्यायी चेहऱ्याची चाचपणी

पिंपरी- दोन खासदार असतानाही गतवेळी शिवसेनेचे एकमेव आमदार पिंपरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले. पंचवार्षिक शेवटच्या टप्प्यात आली, तरी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार चमकदार कामगिरी करु न शकल्याने शिवसेनेसाठी विधानसभेचे मैदान आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे पर्यायी चेहऱ्याचा शोध घेण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली आहे. शिवसेनेची ही अवस्था पाहून विरोधी पक्षातील उमेदवारांच्या अपेक्षा उंचावल्या असून, सर्वच राजकीय पक्षातून इच्छुकांची संख्या वाढत आहे.

अनुुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेला हा मतदार संघ कोणत्याही एका विशिष्ट पक्षीय राजकारणासोबत जात नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्त्वावादी पक्षाचे उमेदवार ऍड. गौतम चाबुकस्वार यांना अनपेक्षितरित्या या मतदार संघात विजय मिळाला. मात्र आतापर्यंतच्या काळात त्यांनी पक्षकार्यातील सहभाग नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्‍त करत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून शिवसेनेत झालेला प्रवेश चाबुकस्वारांची डोकेदुखी ठरविणारा ठरला आहे. पिंपरी विधानसभेतील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून ननावरे यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांकडून माझ्यासाठी पायघड्या घातल्या असल्याचा चाबुकस्वार यांचा दावा आहे. असे असतानाही त्यांनी ननावरे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केलेली नाराजी बरेच काही सांगून जाणारी आहे.

-Ads-

लोकसभेसाठी शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मात्र, हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. भाजपने पिंपरी विधानसभेसाठी स्वतंत्र उमेदवार दिल्यास शिवसेनेच्या मतविभाजनाला ते पूरक ठरू शकेल. त्यातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कट्टर समर्थक चंद्रकांता सोनकांबळे, उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांच्याकडे रिपाइंचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत खुप कमी मतांनी चंद्रकांता सोनकांबळे यांचा झालेला पराभव रिपाइं आणि भाजप कार्यकर्ते विसरलेले नाहीत. भाजपकडून खासदार अमर साबळे यांच्या कन्या वेणू साबळे, अमित गोरखे, शैलेश मोरे हेही इच्छुक आहेत.

युतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि विद्यमान नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या नावाची राष्ट्रवादीत चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या क्षुल्लक चुकांमुळे पत्करावा लागलेला पराभव बनसोडे यांच्या जिव्हारी लागले आहे. पुन्हा आमदार होण्याचा दृष्टीने ते सातत्याने कोणताही गाजावाजा न करता मतदारांच्या संपर्कात आहेत.
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा राज्यातील झंझावात पाहता, पिंपरी विधानसभा मतदार संघातून या पक्षाचा उमेदवार निवडणूक लढविण्याची सर्वाधिक शक्‍यता वर्तविली जात आहे. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी लोकजनशक्ती पक्ष हे राजकीय पक्ष आपली ताकद आजमावू पाहत आहेत. सध्या बहुजन समाज पार्टी राष्ट्रवादीच्या संपर्कात असून, आपल्याकडे दलित मते वळविण्यासाठी राष्ट्रवादीला बसपची मदत होऊ शकते. त्यामुळे बसपचा हत्ती या मतदार संघातील राजकीय गणिते बिघडविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

ऍड. चाबुकस्वारांची वादग्रस्त कारकिर्द…
विद्यमान आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसेनेचे पदाधिकारी नाराज आहेत. शिवसेनेने आयत्यावेळी तिकीट देवून ऍड. चाबुकस्वार यांना विधानसभेत पोहचविले असले तरी त्यांचे पक्षीय पातळीवरील योगदान समाधानकारक नाही, असे शिवसैनिकांचे मत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांचा “वरदहस्त’ एवढी एकमेव बाब वगळता ते त्यांची स्वतःची स्वतंत्र अशी ओळख बनवू शकले नाहीत. उलट त्यांच्या मुलाने रात्री-अपरात्री उड्डाणपुलावर केक कापून केलेली अरेरावी, असो अथवा नारायणगाव येथे स्वतः आमदार ऍड. चाबुकस्वार यांनी वाहतूक पोलिसांशी घातलेली हुज्जत यामुळे त्यांची प्रतिमा वादग्रस्त ठरली आहे.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)