शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही

उद्धव ठाकरे : सत्तेत राहून आम्ही विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रश्न सोडवले
मुंबई – केंद्र आणि राज्यातील भाजपसोबतच्या सत्तेतून शिवसेना बाहेर पडणार नाही. सत्तेत राहूनच जनतेच्या हिताची कामे आम्ही करत राहू, असा निर्वाळा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी येथे दिला. ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नाणार रिफायनरी आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून शिवसेना मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी केली असली तरी ठाकरे यांनी ती फेटाळून लावल्याचे आज स्पष्ट झाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ठाकरे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्तेत राहून आम्ही विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रश्न सोडवले असल्याचा दावा केला. सरकारी महामंडळावरील सदस्यांच्या नेमणुकीची यादी दीड वर्षापूर्वीची आहे. आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही, असे त्यांनी सांगितले.

सनातन आणि नक्षली कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याबाबत त्यांना विचारण्यात आले. तेव्हा हिंदू दहशतवादी आणि शहरी नक्षलवादी अशी लेबलं का लावता? असा सवाल त्यांनी केला. या सरकारमध्ये नवीन गोष्टी घडत आहेत. पोलीस पत्रकार परिषद घेत आहेत. शहरी नक्षलवाद आणि सनातनबद्दल नुसते आरोप सुरू आहेत. हे आरोप करण्यापेक्षा पुरावे सादर करा. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात हिंदू दहशतवादाबद्दल बोलले जात असेल तर ते दुर्देवी आहे, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेलला फोन केल्याचंही सांगितले. गेल्या 12 दिवसांपासून हार्दिकचे उपोषण सुरू आहे. त्याला उपोषण सोडायला सांगितले. उपोषणाने प्रश्न सुटणार नाहीत. हे संवेदनाहीन लोक काहीही करणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात लढणे हाच एकमेव पर्याय आहे. तुझ्या प्रत्येक लढ्यात आमची तुला साथ आहे, असे हार्दिकला सांगितल्याचे उद्धव म्हणाले. पाकिस्तानबरोबर सरकारची चर्चा होऊ शकते तर हार्दिकबरोबर चर्चा का होऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.

रुपया मृत्यूच्या शय्येवर
रिर्झव्ह बॅंकेने अलिकडेच जाहीर केलेल्या अहवालावरून ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. नोटाबंदी फसली आहे. आरबीआयच्या अहवालातून ते स्पष्ट झाले. आता रुपया मृत्यूच्या शय्येवर आहे, याची जबाबदारी सरकार घेणार काय? असा सवाल त्यांनी यावेळी केला. गरज पडली तर पुन्हा नोटाबंदी लागू करू हे रिर्झव्ह बॅंक पुन्हा सांगत असेल तर जनता ते कदापि सहन करणार नाही, असे उध्दव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना सरकार मार्गदर्शनासाठी बोलावणार आहे. ते चुकीचे होते म्हणून तुम्ही त्यांना जायला भाग पाडलंत. मग पुन्हा मार्गदर्शनासाठी त्यांना का बोलावलं जात आहे? असा सवालही त्यांनी केला.

भाजपने “बेटी भगाओ’चा कार्यक्रम सुरू केला का?
महिलांबद्दल मुक्ताफळं उधळणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. निवडणूक काळात वाल्यांचा वाल्मिकी करणा-या भाजपने आता “बेटी भगाओ’चा कार्यक्रम सुरू केला आहे का?’ असा सवाल करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी वाल्याचा वाल्मिकी करू नये. धाडसाने राम कदमांवर कारवाई करावी आणि कोणत्याही राजकीय पक्षांनी कदम यांना उमेदवारी देऊ नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)