शिवसेना शहरप्रमुखांची प्रतिष्ठा पणाला ; नवख्या कोतकरांमुळे सामना अटीतटीचा

नवख्या कोतकरांमुळे सामना अटीतटीचा; कोतकर गड राखणार का?

नगर: कोतकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या केडगाव उपनगरात यंदा कोतकर कुटुंबाविनाच त्यांचे समर्थक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात भाजपच्या चिन्हावर आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कोतकर समर्थक उमेदवार यावेळी महापालिकेच्या निवडणूक लढत आहे. त्यात प्रभाग 17 ड या प्रभागातील लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या अस्तित्वासह प्रतिष्ठेची ही लढत झाली आहे. नवख्या मनोज कोतकर या भाजप उमेदवारांबरोबर अटीतटीचा सामना होत असून त्यात कोण बाजी मारणार याकडे केडगावकरांसह नगरचे लक्ष लागले आहे. त्यात कॉंग्रेसने ऐनवेळी अपक्ष उमेदवार पुरस्कृत केल्याने पारंपारिक कॉंग्रेसची मत या उमेदवाराला गेल्यास कोतकर यांना अडचण ठरू शकते.

सहा महिन्यांपूर्वी केडगाव उपनगरातील पोटनिवडणूक निकालानंतर झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना यांच्यातील संघर्ष सर्वश्रृत आहेत. या हत्याकांडानंतर कोतकर कुटुंबियांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. शिवसेनेने या हत्याकांडातून केलेल्या राजकारणामुळे आज तरी केडगावमध्ये शिवसेना व कोतकर असाच सामना होत आहे. त्यातून कोतकर समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश करून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला आहे. सध्या तरी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष्य केले आहे. त्याचा पराजय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. अर्थात सातपुते यांच्या विरोधात देखील मनोज कोतकर असा तगडा उमेदवार भाजपने दिला आहे. कोतकर तसा नवखा उमेदवार असला तरी या प्रभागात बऱ्यापैकी त्यांचा संपर्क आहे. त्या तुलनेत सातपुते यांचा मुळाचा प्रभाग क्रमांक 16 आहे. तो सोडून ते आज प्रभाग 17 मध्ये निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सातपुते यांच्यासाठी या प्रभागातील भाग नवीन आहे. मोहिनी लोंढे या 17 ब मधील उमेदवारांचा या प्रभागात मोठा प्रभाव असल्याने त्याचा फायदा अन्य उमेदवारांना होणार आहे.

केडगाव म्हटंल की कोतकरांचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात अन्य पक्षाचा उमेदवार विजयी होण्याची शक्‍यताच दुरापास्त. अशावेळी 2008 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत दिलीप सातपुते यांनी शिवसेनेचे खाते उघडून कोतकर यांना आव्हान दिले होते. त्यानंतर सन 2013 मध्ये देखील सातपुते यांनी कोतकर समर्थकांचा पराभव करून आपले वर्चस्व आबाधित ठेवले होते. दोन पंचवार्षिक निवडणुकीत सातपुते यांनी कोतकर समर्थकांचा पराभव केला होता. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व केडगावमध्ये वाढले आहे. आताही सातपुते आपला प्रभाग सोडून थेट कोतकरांच्या खऱ्या बालेकिल्ल्यात घुसले आहेत. त्यामुळे या प्रभागात कोण बाजी मारणार हा प्रश्‍न आहे.

कोतकर हे नवख्ये असले तरी या भागात त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यात आ.कर्डिले स्वतः जातीने या प्रभागात लक्ष देत असल्याने कोतकर यांच्या आशा वाढल्या आहेत. सध्या कोतकर यांच्यासाठी नगर तालुका बाजार समितीची यंत्रणा मदत करीत आहे. मागील निवडणुकीत कोतकर यांनी आपले नशीब अजमावले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यावेळी कोतकर समर्थकांकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता ते कोतकर थेट कोतकर समर्थक म्हणून आज भाजपच्या चिन्हावर उभे आहेत. त्याबरोबर कॉंग्रेसला उमेदवार या प्रभागात मिळाला नाही. त्यामुळे भाजपचे बंडखोर शिवाजी लोंढे यांना पुरस्कृत करून कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. लोंढे यांचा देखील या भागात संपर्क आहे. त्यामुळे मतविभागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)