शिवसेना रस्त्यावरच गणपती बसविणार

राठोड यांचा इशारा; नेता सुभाष तरुण मंडळाचा मंडप पाडल्याचा निषेध

प्रभात वृत्तसेवा
नगर –नगर शहरातील नेता सुभाष तरुण मंडळाचा मंडप पाडण्याची प्रशासनाची कारवाई चुकीची आहे. या कारवाईच्या निषेधार्थ तसेच मंडप पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नगर शहरात तसेच जिल्ह्यात गणपती रस्त्यावर बसवून उत्सव साजरा करू, असा इशारा माजी आमदार अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेताजी सुभाष चौकातील शिवसेनेचा मंडप जमीनदोस्त केला. या पार्श्वभूमीवर राठोड यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, की प्रशासनाच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे गणपती उत्सव साजरा करावा की नाही, अशी मानसिकता नगरमधील गणेशोत्सव मंडळांची झाली आहे. आमच्या सणांवर प्रशासन करीत असलेला अन्याय आम्ही कदापि खपवून घेणार नाही. अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे यांच्यावर कडक कारवाई करावी. मंडप पाडल्याने त्यांच्याकडून नुकसानभरपाई घेण्यात यावी आदी मागण्या करून जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही, अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही.
गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीच्या प्रशासनाने घातलेल्या सर्व अटी किचकट आहेत. नगर शहरातील रस्ते अरुंद आहेत, तरीही सर्व गणेशोत्सव मंडळे सर्व बाबी तपासून गणपती बसवतात, असे सांगून ते म्हणाले, की महापालिकेने अजून मंडप उभारणीस परवानगी देणे सुरू केलेले नाही, तरीही परवानगी नसल्याचे कारण पुढे करून मंडप पाडण्याची केलेली कारवाई चुकीची आहे. मंडप पाडल्यामुळे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले, ती भरपाई द्यायला हवी. उपजिल्हाधिकारी प्राजित नायर आणि अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे या दोघांवरही कारवाई करायला हवी. इथापे हे एका राजकीय पक्षाच्या विचाराचे पुरस्कर्ते आहेत. ते हप्तेखोर आहेत, असे आरोप त्यांनी केले. गणेशोत्सवासाठी कोणत्याही मंडळाने मंडपाची परवानगी घेऊ नये. प्रशासनाने जागेवर येऊन परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी महापौर सुरेखा कदम, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्‍याम शेलार, उपमहापौर अनिल बोरुडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, महिला जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)