शिवसेना उपशहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी

चाकूचा दाखवला धाक : पोलिसांनी आरोपींवर कारवाई न करताच दिले सोडून

विश्रांतवाडी – कुटुंबासमवेत स्वतःच्या मोटारीतून निघालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याला त्याच्या कुटुंबियांसमोरच हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन रात्रीतच सोडून देण्याचा प्रताप विमानतळ पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे गुन्हा घडल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीवर 2 तास दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्याने केला आहे.

-Ads-

याप्रकरणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद रामनिवास गोयल (वय-41, रा. मातोश्री निवास, खेसेपार्क, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. रबलसिंग बलविंदसिंग छाबरा (वय-20) व त्याचे वडील बलविंदसिंग मंगलसिंग छाबरा (वय 63, दोघेही रा. खेसेपार्क, लोहगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार शनिवारी (दि. 1) रात्री आठच्या सुमारास गोयल यांच्या खेसेपार्कमधील घरासमोरच घडला.

गोयल हे त्यांचे आईवडील, पत्नी व 2 मुलांसह मोटारीतून घराबाहेर चालले होते. गोयल यांची मोटार त्यांच्या घराच्या बाहेर येताच दोघाही आरोपींनी त्यांची दुचाकी मोटारीला आडवी घातल्याने गोयल यांनी मोटार थांबवली. त्यानंतर छाबरा बापलेकाने गोयल यांच्याजवळ जाऊन, आत्ताच्या आत्ता तुझ्या बंगल्याचे गेट पाडून टाकायचे, नाहीतर तुझ्या बंगल्याचे गेट आम्ही पाडून टाकू. तू आम्हाला ओळखले नाहीस. आमची मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख आहे. तू कारमधून बाहेर ये नाहीतर, तुला खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच रबलसिंग याने त्याच्या कमरेला लावलेला चाकू (क्रपान) गोयल यांच्यावर उगारला.

या संपूर्ण प्रकारामुळे गोयल यांचे कुटुंबिय भयभीत झाले. त्यानंतर फौजदार दीपक जाधव घटनास्थळी आले. त्यांनी आरोपी व फिर्यादीला विमानतळ पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलीस ठाण्यात गोयल यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तक्रार न देण्यासाठी त्यांच्यावरच दबाव आणला. पोलीस तक्रार घेत नसल्याने गोयल यांचा रक्तदाब वाढला आणि ते पोलीस ठाण्यातच कोसळले. त्यानंतर गोयल यांच्या मित्राने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर पोलिसांनी छाबरा बापलेकावर रात्री एकच्या सुमारास गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करत असल्याचे पोलिसांनी गोयल यांच्या भावाला सांगितले. मात्र, गोयल यांचे भाऊ पोलीस ठाण्यातून घरी आल्यानंतर दोघाही आरोपींना रात्रीतच घरी सोडून देण्यात आले.

पोलिसांकडून खोटी माहिती
याबाबत रविवारी (दि.2) सकाळी प्रसारमाध्यम प्रतिनिधी, आनंद गोयल व त्यांच्या भावाने फौजदार दीपक जाधव यांना संपर्क केला असता, एक आरोपीला अटक केल्याचे व दुसरा आरोपी ज्येष्ठ नागरिक असल्याने त्याला नोटीस दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र दोन्ही आरोपींना पोलिसांनी सोडून दिले होते. याविषयी विचारले असता, आपण कर्मचाऱ्यांना आरोपीला ताब्यातच ठेवण्यात सांगून पहाटे घरी निघून गेलो होतो. दोन्ही आरोपींना सोमवारी अटक करून कोर्टात हजर करण्यात येईल, असे दीपक जाधव म्हणाले. तर आरोपींना सोडल्याबद्दल चौकशी केली जाईल व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे म्हणाले. आरोपींकडून माझ्या जीवाला धोका असताना ताब्यातील आरोपींवर कारवाई न करता पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याचा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. अशा प्रकारामुळे गुन्हेगारांचे अधिकच फावते व त्यांना पोलीस व कायद्याचा धाक राहत नाही. एका राजकीय पदाधिकाऱ्याला पोलीस अशी वागणूक देत असतील, तर सर्वसामान्यांना काय न्याय मिळणार, असा सवाल करत आनंद गोयल यांनी केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)