शिवसृष्टी, चांदणी चौक उड्डाणपूल रखडणार?

महापालिकेची कोंडी : “बीडीपी’ मध्ये 8 टक्के “टीडीआर’ मोबदला निर्णय

रोख रकमेपोटी तब्बल 600 कोटींची गरज

-Ads-

पुणे – महापालिका हद्दीतील 23 गावांच्या टेकड्यांवर असलेल्या जैव विविधता उद्यान (बीडीपी) जागा ताब्यात घेण्यासाठी राज्यशासनाने जागा मालकांना आता 8 टक्के “टीडीआर’ अर्थात विकास हस्तांतरण अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे “बीडीपी’मध्ये प्रस्तावित शिवसृष्टी प्रकल्प आणि चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे भूसंपादन अडचणीत आले आहे.

चांदणी चौकातील उर्वरीत 6 हेक्‍टर भूसंपादनासाठी सुमारे 180 कोटी रुपये, तर शिवसृष्टीच्या 53 एकर जागेसाठी सुमारे 437 कोटी रूपये लागणार असल्याचा अहवाल महापालिकेच्याच मालमत्ता व्यवस्थापन विभागाने सादर केला आहे. मात्र, आता शासनाने 8 टक्के “टीडीआर’चा निर्णय घेतला असल्याने या दोन्ही प्रकल्पासाठीच्या जागा मालकांना 8 टक्के “टीडीआर’देण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. या जागा देण्यास जागा मालक तयार होतील की, नाही? हा नवीन प्रश्‍न प्रशासनासमोर उभा आहे.

भूसंपादनाचा तिढा सुटेना
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने या चौकात दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. मात्र, त्याचे काम “एनएचएआय’कडून केले जाणार आहे. हे भूमिपूजन सप्टेंबर-2017 मध्ये झाले. मात्र, त्यानंतरही या पुलासाठी आवश्‍यक जागा ताब्यात न आल्याने काम “एनएचएआय’ने सुरू केले नाही. पुलासाठी 13. 92 हेक्‍टर भूसंपादन तसेच 67 सदनिका आणि दोन बंगले प्रभावित होणार आहेत. गेल्या वर्षभरापासून महापालिका या भूसंपादनाचा प्रयत्न करत आहे. मात्र, अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे भूमिपूजन होऊनही पुलाचे काम रखडलेले आहे. त्यावर 80 टक्के भूसंपादन केल्यानंतर कामाला सुरूवात केली जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. दरम्यान 56 टक्केच जागा ताब्यात आली असून उर्वरीत जागा मालकांनी रोख मोबदल्याची मागणी केली आहे. त्यासाठी तब्बल 180 कोटींची आवश्‍यकता आहे. मात्र, एवढा निधी देणे पालिकेला शक्‍य नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे या निधीची मागणी केली आहे. आता त्यातच शासनाने बीडीपीच्या जागेसाठी 8 टक्के टीडीआर द्यावा लागणार आहे. हा “टीडीआर’ एका एकराला अवघा 3,200 चौरसफूट मिळणार आहेत. म्हणजे, 6 हेक्‍टरसाठी अवघा 40 हजार चौरसफूट (टीडीआर) मोबदला मिळणार आहे. त्यामुळे जागा मिळण्याबद्दल साशंकता आहे.

शिवसृष्टीही अडचणीत
महापालिकेकडून कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेत प्रस्तावित करण्यात आलेले शिवसृष्टी राज्यशासनाने चांदणी चौकातील “बीडीपी’ जागेत स्थलांतरित केली आहे. मात्र, यासाठी स. नं. 11 आणि 100 ची सुमारे 53 एकर 28 गुंठे जी जागा निवडण्यात आली, तिचे तब्बल 157 मालक असून भूसंपादनासाठी तब्बल 437 कोटी रुपयांचा मोबदला जागा मालकांना द्यावा लागणार असल्याचा मालमत्ता व्यवस्थापन विभागाने अहवाल तयार केला होता. तो सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनाही पाठविला होता. मात्र, आता शासनाने शिवसृष्टीच्या मोबदल्याचा निर्णय घेतानाच उर्वरीत “बीडीपी’लाही 8 टक्के “टीडीआर’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा मोबदलाही जागा मालकांसाठी खूप कमी असल्याने हे जागा मालकही रोखीनेच मोबदला मागण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेस शासनाच्या निर्णयामुळे “टीडीआर’ देण्याचा पर्याय असतानाही या प्रकल्पासाठी रोखीने मोबदला देण्याची वेळ येणार आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)