शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण!

  • लोणावळा नगर परिषद : एकमताने विषय मंजूर

लोणावळा – शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळा परिसर विकसित व पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा विषय लोणावळा नगर परिषदेच्या विशेष सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.

लोणावळा नगर परिषद सभागृहात प्रभारी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेमध्ये शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याबाबतचा विषय सभागृहासमोर ठेवण्यात आला. नगरसेवक निखिल कवीश्‍वर, शादान चौधरी, दिलीप दामोदरे, भरत हरपुडे, देविदास कडू, आरोही तळेगावकर, राजू बच्चे यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवकांनी या विषयाचे स्वागत केले. तसेच सुशोभीकरणाचे काम कसे करण्यात यावे, याबाबत विविध सूचना मांडल्या. महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या आराखड्याचे काम ठेकेदारकडून करून घेतले जाणार आहे. हा आराखडा नागरिकांना दाखवल्यानंतर मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर त्याचे अंदाजपत्रक काढून काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

-Ads-

जागेच्या भाडेपट्ट्याबाबत चर्चा
महिला मंडळाला भाड्याने दिलेल्या जागेच्या भाडेपट्टा करारावर यावेळी विशेष सभेत चर्चा झाली. क्रीडा संकुलासाठी आरक्षित जागेत 1955 साली 50 वर्षांच्या कराराने नाममात्र 1 रुपये भाडे आकारून काही जागा महिला मंडळास देण्यात आली होती. मात्र त्यांचा करार 2004 साली संपल्यानंतर भाडे करार वाढवण्याबाबत अनेक मतप्रवाह निर्माण झाले. यावर महिला मंडळाने पालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. त्यामुळे भाडेपट्टा करार वाढवण्याचा निर्णय न्यायालयाच्या निकालानंतर घेण्याचे सभेत ठरले. महिला मंडळ ही सामाजिक संस्था असून अशा संस्था जगवल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याबाबत नगर परिषद अनुकूल आहे. भविष्यात क्रीडा संकुल विकसित करताना महिला मंडळाचे पुनर्वसन करू, असे नगराध्यक्ष पुजारी यांनी प्रतिपादन केले.

नियोजित क्रीडा संकुलात “वॉकिंग ट्रॅक’
हुडको कॉलनी जवळील नियोजित क्रीडा संकुलामध्ये “वॉकिंग ट्रॅक’ विषयावर सभागृहात मोठी चर्चा झाली. नगरसेवक राजू बच्चे, निखिल कवीश्‍वर, दिलीप दामोदरे, भरत हरपुडे, शादान चौधरी, शिवदास पिल्ले यांनी या नियोजित ट्रॅकबाबत क्रीडा संकुलाच्या जागेबाबत तसेच या जागेवरील अतिक्रमणाबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर संपूर्ण क्रीडा संकुलाच्या जागेची मोजणी करून संकुलाची हद्द कायम करावी आणि त्यानंतर “वॉकिंग ट्रॅक’ तयार करण्याचा विषय मंजूर करण्यात आला.

शिवाजी महाराज पुतळा शहरातील एक आकर्षण ठरेल आणि लोणावळेकरांना हा पुतळा आपल्या शहरात आहे, याचा अभिमान वाटेल, असे काम या ठिकाणी केले जाईल.
– श्रीधर पुजारी, प्रभारी नगराध्यक्ष, लोणावळा नगर परिषद.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)