तळेगाव ढमढेरे- शिवतक्रार म्हाळुंगी येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या खांबांना पडलेल्या चिरा, कुजलेले दरवाजे, खड्डे, वाहून गेलेले दगड आदी कारणांमुळे बंधाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन दुरवस्था झाली आहे. या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य उमेश काळे व ग्रामस्थांनी केली.
बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. आलेगाव पागा यादरम्यान भीमा नदीवर एकूण 8 बंधारे आहेत. त्यापैकी हा बंधारा सर्वात जुना आहे. याची मोठ्या प्रमाणात झालेली गळती शेतकऱ्यांसाठी हानीकारक ठरला आहे. त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. यावेळी शाखा अभियंता पी. वाय. सोनावणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना तातडीने बंधाऱ्याची गळतीबाबत माहिती दिली आहे. ग्रामस्थ आणि शेतकरी मदत करण्यास तयार आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. दुरुस्तीसाठी पुन्हा नव्याने खर्चाचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी देऊन काम पूर्ण होणे गरजेचे असल्याचे काळे यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार अधिकारी सोनवणे यांनी या बंधाऱ्याची पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी संचालक मनोज वडघुले, निवास साकोरे, हर्षवर्धन काळभोर, बजरंग वडघुले, प्रवीण वडघुले रमेश साकोरे, समीर राऊत, निलेश साकोरे, विलास काळे, हनुमंत जाधाव, संजय काळे व शेतकरी उपस्थित होते. सध्या हा बंधारा तुंडुब भरला असून येथील शेतकऱ्यांना पाऊस नसल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वरदान ठरत आहे. शेतातील पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या सुटला आहे. परंतु बंधाऱ्यातून सततची पाणी गळती राहिल्यास हा प्रश्न गंभीर होऊन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, यासाठी तातडीने बंधाऱ्यातील गळती थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
- शिवतक्रार म्हाळुंगी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. अशाप्रकारे पाणी गळती राहिल्यास पुढील 2 महिने पाणी पुरणार नाही, यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी कमी पडण्याची शक्यता आणि त्यात असा पाण्याचा अपव्यय झाल्याने नदीलगतची पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
– निवास साकोरे, प्रगतशील शेतकरी, टाकळी भीमा.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा