शिर्डीला विकासाची आस…

file photo

श्री साईबाबांच्या समाधीला यावर्षी विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण होत असून, या शतकपूर्ती दिव्यप्रसंगाला अत्यंत द्रष्टेपणाने पाहणे प्रत्येक घटकाची जबाबदारी असून, यात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिक, भाविक व मुख्यत्वे करून ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. शिर्डीतील श्री साईबाबा हे देश-विदेशात प्रचंड ख्याती व भक्ती संप्रदायाचे प्रतीक असलेले जागतिक कीर्तीचे देवस्थान झाले आहे. साईबाबांची मुख्य समाधी शिर्डी येथे आहे. साईसमाधी शताब्दी सोहळ्यानिमित्ताने शिर्डी व परिसरात बरेच बदल होणे अपेक्षित होते. याचा जनसामान्यांना व राजकीय तसेच प्रशासकीय कार्यपद्धतीवर परिणाम दिसला असता. हे सारे सकारात्मक व दूरदृष्टीने झाले असते तर परिसरात आज झालेले परिवर्तन हे विकासाचा मैलाचा दगड ठरले असते. 

शताब्दीनिमित्ताने राज्य शासनाने सुमारे साडेतीन हजार कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. तो केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्यापपावेतो शिर्डीच्या विकासासाठी एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे शहरी विकासाच्या आशा धूसर झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याउलट साईबाबा संस्थानच्या तिजोरीतून बाहेरील जिल्ह्यात विशेषतः विदर्भातील नागपूर, यवतमाळ येथे निधी देण्यासाठी तत्काळ मंजुरी मिळते ही मात्र विशेष बाब आहे. साईसमाधी शताब्दीच्या निमित्त शिर्डीत विविध विकासकामे व उपक्रम राबविण्याचे राज्य शासन आणि साईबाबा संस्थानने ठरविले आहे. त्यामध्ये शहरातील सुसज्ज रस्ते, विकासकामे, स्वागत कमानी यासह साईभक्ताभिमुख विविध पायाभूत सुविधा देण्याचा निर्णय राज्य शासन व संस्थान स्थरावर झालेला आहे. साईबाबा संस्थानकडे ना निधीची कमतरता ना दानशूर भक्तांची कमतरता, तसेच साईबाबांच्या कृपेने लाल फितीत न अडकणारा फायलींचा प्रवास असे असताना नेमकी ही विकासाची कामे कुठे अडतात हाच प्रश्न यानिमित्ताने साईभक्तांसमोर उभा ठाकत आहे.

साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून सुमारे कोट्यवधी भाविक येतात. दोन अंकी देणगीने सुरू झालेले साईबाबा संस्थान आज सुमारे दोन हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांचे मालक झाले आहे. शिर्डीत साईसमाधी शताब्दी महोत्सवानिमित्त मोठी विकासाची कामे होतील. शिर्डी शहराचा विकासात्मक रूपाने कायापालट होईल, भक्तांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही. सुविधांचा बोजवारा उडणार नाही. खऱ्या अर्थाने शताब्दी समाधी महोत्सव साईंच्या नगरीत साईभक्तांसाठी भरपूर काही देऊन जाईल, अशी अपेक्षा शिर्डीकरांसह साईभक्तांची होती. मात्र, ही अपेक्षा सर्वांसाठी भ्रमाचा भोपळा ठरल्याचे दिसून येत आहे. साईसमाधी शताब्दी महोत्सवाची सुरुवात ऑक्‍टोबर 2017 मध्ये देशाचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचा शुभारंभ झाला. मात्र, त्यानंतर शिर्डीतील विकासाला पाहिजे तेवढी गती का मिळाली नाही? हा संशोधनाचा विषय साईभक्तांच्या दृष्टीने बनला आहे.

सोहळ्याच्या शुभारंभापूर्वी स्वागत कमानी तयार होऊन भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज असायला हव्या होत्या. मात्र, समाधी शताब्दी वर्षातील पाच महिने उलटून गेल्यानंतरही स्वागत कमानी उभ्या राहू न शकल्याने या कमानी वरातीमागून घोडे अथवा सोहळ्यानंतर फुले यानुसार तर उभारल्या जाणार नाही ना? हाच यानिमित्ताने साईभक्तांसह सर्वांपुढे उभा राहणारा प्रश्न आहे. अलीकडेच परिसरातील निरपेक्ष भक्ताभिमुख सेवा देण्यासाठी विकासाची अपेक्षा ठेवत त्याचबरोबर संस्थांच्या अनागोंदी व मनमानी कारभारावर, तसेच शताब्दी वर्षाचा व्याप पाहता यावर अंकुश ठेवण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, कुठलेही काम होत नसल्याने अधिकारी पोसण्याचे काम साईबाबा संस्थान करीत आहे. यातून परिवर्तनाचा सर्वसमावेशक परिणाम दिसावा ही अपेक्षा.

 

 

 

राजकुमार जाधव 
राहाता 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)