शिर्डीत मार्केट कर व वाहनतळाची पठाणी वसुली

भाजप, शिवसेनेचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

शिर्डी – शिर्डी शहरातील दररोजची मार्केट वसुली कर व वाहन तळ वसुलीच्या ठेक्‍याबाबत जनतेत असंतोष पसरला आहे. ठेकेदाराने गुंडांची भरती करून दमदाटी तसेच मारहाण करीत पठाणी वसुली सुरु केल्याने आठवडा भरात अनेक मारहाणीच्या घटना सोशल मिडीयाच्या मार्फत व्हायरल झाल्या आहेत. सामान्य व्यावसायिक आणि भाविकांना या ठेकेदारांमार्फत वसुली कर्मचाऱ्यांकडून मारहाण होत असल्याने शिर्डीतील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निषेधार्थ भाजप, शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीने शिर्डी नगरपंचायतवर आक्रोश मोर्चा काढला.
पठाणी वसुली बंद करा, अशा घोषणा देत मोर्चेकरांनी मुख्याधिकाऱ्यांचे दालन दणाणून सोडले. भाविकांना होणारा त्रास आणि ठेकेदारांच्या गुंडानी केलेली मारहाणीमुळे हा ठेका तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी सतीश दिघे यांना देण्यात आले. दरम्यान मोर्चेकऱ्यांच्या भावना लक्षात घेता शिर्डी नगरपंचायतने ठेकेदारावर कारवाई होईपर्यंत ठेक्‍यास तात्पुरती स्थगिती दिली असल्याचे दिघे यांनी सांगितले. शिर्डी शहराला शिस्त लागावी म्हणून हा ठेका देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र यातून नगर पंचायतला महसूल मिळावा, हा उद्देश नसल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, ठेकेदाराने वसुलीसाठी गुंडाची भरती करुन सामान्य नागरिक आणि भाविकांना मारहाण सुरु केल्याने ही वसुली तात्काळ बंद करावी,अशी मागणी भाजप, शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगरसेवक शिवाजी गोंदकर, रवींद्र गोंदकर, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख संजय शिंदे, राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, विधानसभा संघटक कमलाकर कोते, नगरसेविका अनिता जगताप, विजय जगताप, सचिन शिंदे, सुनिल परदेशी, स्वानंद रासने, दत्ता आसणे, सचिन कोते, आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-

नगरपंचायत हद्दीत साईभक्‍त तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूकीची कोंडी होते. रस्त्यावर वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी नगरपंचायतने वाहन तळाचा ठेका दि.13 एप्रिल 2018 रोजी नगरपंचायतीने सर्वानुमते मंजूर केले. मोफत वाहनतळासाठी नगरपंचायातने 10 एकर जागा उपलब्ध करून दिली असतांना रस्त्यावर वाहने उभी करून भाविकांना अडचण निर्माण होत असल्याने त्यांना पे ऍन्ड पार्क तत्वावर वाहनधारकांकडून पार्किंग वसुली केली तर मोफत पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी करतील, असा धोरणात्मक निर्णय सभागृहात झाला होता. यावेळी बैठकीस 17 पैकी 16 नगरसेवक उपस्थित होते. यावेळी भाजपचे नगरसेवक शिवाजी गोंदकर आणि शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप यांनी वाहन तळाच्या वसुली ठरावाच्या बाजूने मत दिले होते.
अभय शेळके,
नगरसेवक शिर्डी नगरपंचायत

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)