शिर्डीत बंधाऱ्यावरील वाट धोकादायक

शिर्डी, (प्रतिनिधी) – गोदावरी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या वसंत बंधाऱ्याच्या पुलाचे कठडे तुटले आहेत, तसेच या रस्त्याची दुरवस्था झाल्याने बंधाऱ्यावरून प्रवास करणे दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक बनले आहे.

या पुलावरून दररोज प्रवास करणाऱ्या डोणगाव, लाखगंगा, बापतरा, पुणतांबा या गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी करूनही पुलावरच्या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. पुलावरच्या कठड्यांनाही लोखंडी पाइप बसविले जात नाही. अपघात झाल्यानंतर संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना जाग येणार का? अशी संतप्त भावना ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे. सध्या बंधाऱ्यावरचे कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. कठड्यावरचे पाइप केव्हाच चोरट्यांनी कापून गायब केलेले आहेत.

या रस्त्यावरून जड वाहतूक होऊ नये म्हणून पुलाच्या पूर्ववत पश्‍चिम बाजूला बसविलेले लोखंडी गतिरोधक व कमानी पुराच्या वेळी वाकल्या. तेथे लोखंडी पोलही दिसून येत नाही. बंधाऱ्याच्या रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना खड्डा चुकविण्याच्या नादात जीव गमावण्याचा धोका पत्करावा लागेल, अशी अवस्था झाली आहे.
पुणतांबा येथे शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात. त्यामुळे बंधाऱ्याच्या पुलाची दुरुस्ती करून त्याला तातडीने कठडे बसवावेत, अशी मागणी डोणगावचे सरपंच दादा डोखे, माजी सरपंच सुधाकर जाधव, संभाजी गमे, भाऊसाहेब केरे, चांगदेव महाराज देवस्थानचे व्यवस्थापक महेश मुरुदगण, आदींसह मान्यवरांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)