शिर्डीत पुढील महिन्यात सहकार परिषद 

सुरेश वाबळे : केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची प्रमुख उपस्थिती
राहुरी – ग्रामीण अर्थव्यवस्थेला आर्थिक बळकटी देणाऱ्या महाराष्ट्रातील पतसंस्था आणि मल्टीस्टेट पतसंस्थांसमोर आर्थिक कामकाज करताना येणाऱ्या समस्यांवर चर्चा घडवून आणण्यासाठी पुढील महिन्यात शिर्डी येथे सहकार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली.
सहकार परिषदेला केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी उपस्थित राहण्याबाबतचे फेडरेशनचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या फेडरेशनच्या कामाचे कौतुक करून शासनाच्या कामाचा भार हलका करीत असल्याबद्दल शिष्टमंडळाला धन्यवाद दिल्याचे वाबळे यांनी सांगितले.
दिल्ली येथे सुरेश वाबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री सिंह यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मल्टीस्टेट व पतसंस्थांच्या समस्यांचा पाढा वाचला. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्‍त करून सहकार्य करण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.
वाबळे म्हणाले, सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. त्यामुळे राज्याला जागतिक पातळीवर सहकाराची पंढरी समजले जाते. देशाला सहकाराची कास धरण्याचे धडे महाराष्ट्राने दिले. मात्र, काही संस्था चुकीचा अर्थव्यवहार करीत असल्याने सहकार चळवळ मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. सहकार संस्थेच्या माध्यमातून पारदर्शीपणे कारभार करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. दैनंदिन अर्थकारणाच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी या सहकार परिषदेच्या व्यासपीठावर मांडून त्या सोडविण्याच्या दृष्टीने एक नवा अध्याय सुरू करण्याचा फेडरेशनचा मानस असल्याचे वाबळे यांनी स्पष्ट केले. मल्टीस्टेट व पतसंस्थांच्या कामकाजात सुसूत्रता यावी, चुकीचा कारभार करणाऱ्या सहकारी संस्थांवर नियंत्रण असावे, ठेवीदारांनी ज्या विश्‍वासाने ठेवी ठेवल्या, त्यांच्या सुरक्षेविषयी सुसंवाद निर्माण व्हावा, भविष्यात या सहकारी संस्थांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेस केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय जॉईंट रजिस्ट्रार आशिषकुमार भुतानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही सहकार परिषद शिर्डी येथे होणार आहे.
केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात फेडरेशनचे संचालक कडूभाऊ काळे, शिवाजीराव कपाळे, अंकल कोटे पाटील, राहुल महाडीक, पानमंद, जयसिंह पंडीत, डॉ. निंबाळकर, विठ्ठल वाडगे, अभिनाथ शिंदे, सीए सचिन शिंदे, प्रवीण प्रजापती आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)