शिर्डीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत

गेली काही दिवस उडाला होता बोजवारा

शिर्डी – गेल्या अनेक दिवसांपासून बेशिस्त वाहनचालकांमुळे शिर्डी शहरात वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली आहे. याविरोधात नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे साईभक्तांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांनी पोलिसांसमवेत वाहतूक व्यवस्थेसंदर्भात पूर्वी बैठक घेतली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी योग्य कारवाई करत बेशिस्त वाहनचालकांवर जबर बसविली. अनेकांवर कारवाई केली. सर्व काही सुरळीत झाले असे वाटत असतानाच निरीक्षक पाटील यांची बदली झाली. त्यानंतर पुन्हा वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

शनिशिंगणापूर, नाशिक, औरंगाबाद येथे साईभक्तांना घेऊन जाणाऱ्या गाड्या तसेच मनमाड, नगरसूल, कोपरगाव, राहाता येथून येणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहने या सर्वांना विशिष्ट थांबे देण्यात आले होते. वाहनतळातून साईभक्तांना आवश्‍यक त्या ठिकाणी जाण्यासाठी सोय करण्यात आली होती. अशा प्रकारच्या नियोजनामुळे सुरुवातीला वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू होती. मात्र, त्याचवेळी पाटील यांची बदली झाली.
नव्याने रुजू झालेले वाहतूक शाखेचे निरीक्षक दौलत जाधव यांनी पदभार स्वीकारला. नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी निरीक्षक जाधव यांना विस्कळीत वाहतूक व्यवस्थेविषयी बैठक घेण्याची सूचना केली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनाही भेटून वाहतुकीसंदर्भात चर्चा केली.

बैठकीत सर्व वाहनधारकांना देखील बोलावण्यात आले होते. जाधव यांनी नगराध्यक्षा योगिता शेळके यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. नगराध्यक्षा यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जाधव यांनी वाहनधारकांना आवश्‍यक त्या सूचना करत तंबीदेखील दिली. त्याचा परिणाम म्हणून मागील आठवड्यापासून शिर्डी वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनांवर अतिशय कडक कारवाई सुरू केली आहे. सर्व वाहने पुन्हा पार्किंगमध्ये थांबत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या वाहनांना ब-यापैकी शिस्त लागल्याचे दिसून येत आहे.
शिर्डी नगरपालिकेच्या कामकाजावर डॉ. एकनाथ गोंदकर, कैलास बापू कोते, सुधाकर शिंदे, पतिंगराव शेळके, विजयराव कोते, रमेशभाऊ गोंदकर यांचे नेहमी लक्ष असते, त्यातून नगराध्यक्षा योगिता शेळके यांना आवश्‍यक त्या सूचना दिल्या जातात.
पोलिसांसमवेत झालेल्या बैठकीस उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, अशोक गोंदकर, सभापती सुजित गोंदकर, नगरसेवक सर्वश्री अभय शेळके, मंगेश त्रिभूवन, नितीन कोते, नितीन शेजवळ, पोपटराव शिंदे, बिलाल शेख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)