शिर्डीच्या एकमेव उद्यानातील कारंजेही बंद 

विद्युतपंपात बिघाड : बगीच्या कर्मचाऱ्यांकडून विसंगत माहिती
शिर्डी – श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साईबाबा विश्‍वस्त व्यवस्था मंडळाने शिर्डीत येणाऱ्या-जाणाऱ्या साईभक्‍तांच्या करमणुकीसाठी मोठमोठ्या मनोरंजनाच्या प्रकल्पांची केलेली घोषणा हवेत विरल्याचे दिसते. सध्यस्थितीत द्वारावती भक्‍तनिवाससमोरील उद्यानात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले कारंजे आठ दिवसांपासून विद्युत पंपअभावी बंद आहेत.
ऐन उन्हाळ्यात गार वाऱ्याची झुळूक घेण्यासाठी येणारे ग्रामस्थ, भाविकांमध्ये मात्र या प्रकारामुळे नाराजी आहे. दरम्यान संस्थान प्रशासन, बगीच्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
एकीकडे साई समाधी शताद्बी निमित्त शिर्डीत भाविकाला स्थिरावण्यासाठी अनेक योजनांना साकारण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने “लेझर शो’मध्ये संगीतावरील पाण्याचे कारंजे साई भक्तांच्या मनोरंजनासाठी निर्माण करण्याच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. तर दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले द्वारावती भक्तनिवास परिसरातील नावाजलेला बगीच्या सुरवातीपासूनच येणाऱ्या भाविकांच्या व शिर्डी ग्रामस्थांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. गेल्या आठ दिवसापासून बंद असलेल्या कारंजाची दुरुस्ती करणे संस्थान प्रशासनाला जमलेले नाही. तसेच संबंधित कर्मचारी विसंगत कारणांचा आधार घेत कारंजे बंद ठेवणे किती गरजेचे आहे हे पटवून देण्यात आपली ऊर्जा खर्च करीत आहेत.
सकाळी, सायंकाळी मोठ्या संख्येने साईभक्‍त, ग्रामस्थ बाळगोपाळांना घेऊन येत असतात. प्रशासनाने बागेतील हिरवीगार लॉन्स काढून मोठ्या प्रमाणावर पेव्हर ब्लॉक बसविले आहे. तसेच काही ठिकाणी कॉक्रिंटीकरणही केले आहे. त्यामुळे हिरवळीवर बसणे, बागडे यापासून मुलेही वंचीत राहत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पूर्वी सायंकाळी बागेमध्ये जुनी मराठी, हिंदी चित्रपटाची गाणी ऐकायला मिळायची. मात्र मागे काही दिवसांपूर्वी येथे पेव्हर ब्लॉक बसविताना वायरिंग तुटल्याने गाणे ऐकायला मिळण्याची प्रथाही बंद झाली आहे.

टारगट मुलांचा वाढता त्रास…
गेल्या काही दिवसांपासून बागेत येणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या वाढली आहे. त्यामुळे काही टारगट मुलेही बागेत येतात. त्यांचा काहीसा उपद्रव बागेत वाढला आहे. त्यामुळे येथे असलेल्या एका सुरक्षारक्षकाला ही परिस्थिती हाताळाने अवघड जाते. त्यामुळे येथे अधिक सुरक्षारक्षक असायला हवेत. या सर्व प्रकाराने येथे सहकुटूंब येणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकही येथे येण्यास टाळाटाळ करीत आहेत. हा सर्व प्रकार रोखण्यासाठी येथे सीसीटीव्ही बसविण्याची मागणीही होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)