शिर्केशाळा मैदाच्या निधीवरुन पुन्हा वादाची ठिणगी

राजकीय द्वेषातून विरोध
या संदर्भात प्रभात ने सातारा विकास आघाडीच्या कला क्रीडा संस्कृती विभाग प्रमुख सुजाता राजेमहाडिक यांच्याशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या निवेदनातील तक्रार ही साफ चुकीची आहे. शिर्के शाळा मैदान पालिकेने ठराव करून महिना 4 हजार रूपये भाड्याने दिले आहे. शिर्के शाळा मैदानावर खेळण्यासाठी कोणालाही अडवले जात नाही. क्रिकेट खेळायला साताऱ्यात बरीच क्रीडांगणे आहेत. ज्यांनी ही तक्रार केली ती मैदानावर कायम उपस्थित असतात का? आणि ज्या ठरावाला पालिका सहा दिवसांनी मंजूरी देणार आहे तो सातव्या क्रमांकाचा ठराव तक्रार करणाऱ्यापर्यंत पोहचलाच कसा? हा सर्व विरोध राजकीय हेतूने होत आहे. त्रिसदस्यीय समितीकडून भाडे निश्‍चित करण्याचे पत्र देण्यात आले आहे. मात्र त्या ठरावावर अद्याप नगराध्यक्षांची सही न झाल्याने भाडे प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

सातारा -शिर्के शाळा मैदानाच्या क्रीडांगणावर पुन्हा बास्केटबॉल ग्राउंड बनवण्यासाठी पालिका देऊ करणाऱ्या 15 लाख रुपये निधीच्या मुद्यावर वादाची ठिणगी पडली आहे. गुरूवार पेठ, केसरकर पेठ, शनिवार पेठेतील एकशे तीस युवकांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. हे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांना देण्यात आले.

जुन्या शिर्के शाळा मैदानाचे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण करण्यात आले आहे. माजी उपनगराध्यक्ष सुजाता राजेमहाडिक यांच्या कार्यकाळात या क्रीडा संकुलाच्या कामाचा नारळ फोडण्यात आला होता. वैशिष्ट्यपूर्ण फंडातून तब्बल 68 लाख या संकुलासाठी रुपयांचा खर्च झाल्याची नोंद आहे. या निधीतून वॉकिंग ट्रेंक, बास्केटबॉल कोर्ट, बॅडमिंटन हॉल आणि तीन बाजूची संरक्षक भिंत बांधण्यात आली. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी पाच वर्षापूर्वी केल्याने ही क्रीडांगण चर्चेत आले होते. आता याच संकुलावर बास्केटबॉल कोर्टच्या दुरूस्तीसाठी 15 लाख पालिका जनरल फंडातून देण्याचा घाट घातला गेला आहे. येत्या 28 तारखेला पालिकेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सात क्रमांकाचा विषय असून त्या ठरावाला तीव्र विरोध होण्याची चिन्हे आहेत.

बास्केटबॉल ग्राउंड

प्रस्तावित बास्केटबॉल ग्राउंड रद्द करावे
या ठरावाची कुणकुण लागताच केसरकर पेठ, शनिवार पेठ व गुरुवार पेठेतल्या सतर्क तरूणांनी मंगळवारी थेट पालिकेत येऊन उपनगराध्यक्षांसमोर लेखी आक्षेप नोंदवला. या निवेदनात असे नमूद आहे की गुरुवार पेठ येथील सर्वे नं. 271 येथील जागा आरक्षण उठवून विकत घेण्यात आली होती. सदर क्रीडांगणावर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बास्केटबॉल कोर्ट व बॅडमिंटन कोर्ट विकसित करण्यात आले आहे. उर्वरीत मातीच्या मैदानाचे सिमेंट अस्तरीकरण करून तिथेही बास्केटबॉल कोर्ट झाल्यास सामान्य मुलांनी खेळायचे कोठे? बास्केट बॉल ग्राउंडवर काही व्यक्ती बेकायदेशीरपणे शुल्क घेउन मुलांना बास्केटबॉल प्रशिक्षण देतात. मोकळ्या जागेत गरीब मुलांना खेळू दिले जात नाही. त्यांना भिंतीवर बसून खेळ पहात बसावे लागते, अशी तक्रार निवेदनात नमूद आहे. या क्रीडांगणाचे प्रस्तावित बास्केटबॉल ग्राउंड रद्द करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)