शिरूर शहर आणि परिसरात डेंग्यूचे थैमान

शिरूर – शिरूर शहर आणि परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, येथील अनेक भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. मात्र याबाबत नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे वास्तव समोर आले आहे. संपूर्ण शिरूर शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्यज विभागाचे दोन आणि शिरूर नगर परिषदेचे दोन कर्मचारी उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आधुनिक यंत्रणा नाही, तसेच फवारणी औषधही नाही, असे दिसून आल्याने या भागातील प्रशासकीय भोंगळ कारभार समोर आला आहे.
शिरूर शहर आणि परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. शहराच्या अनेक भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. येथे असलेल्या आरोग्य केंद्रात प्लेटलेट्‌सचाही तुटवडा असल्याने येथील रुग्णांना उपचारासाठी पुण्याला जाण्याशिवाय पर्याय नाही. येथील जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी देखील रुग्णांना रक्ततपासणीसाठी पुण्यात पाठवत आहेत. येथील तपासणीचा रिपोर्ट आल्याशिवाय रुग्णाला असलेल्या आजाराचे निदान होत नाही. रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे जिवाच्या भीतीने येथील नागरिक रुग्णांना उपचारासाठी पुण्याला नेत आहेत.
शहरातील आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सवरसामान्य नागरिकांच्या घरात देखील डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत; परंतु नगर परिषद अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत जावईशोध लावला आहे की, येथे असणारे रुग्ण हे डेंग्यूचे नाहीतच.
शिरूर शहरात नगराध्यक्ष राहत असलेल्या प्रणव अपार्टमेंटजवळच मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या आळ्या सापडल्या आहेत. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे; परंतु नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे.

शहरातील प्रत्येक भागात डेंग्यूच्या आळ्या सापडत आहेत. टायर दुकानांमध्ये देखील त्या सापडल्या आहेत. अनेक ठिकाणी बांधकामे चालू आहेतल त्या ठिकाणी देखील या आळ्या सापडत आहेत; परंतु कुठलीही आधुनिक यंत्रणा आम्हाला उपलब्ध करून दिली जात नाही. येथे फवारणीसाठी औषधे देखील मिळत नाहेत. केवळ दोन स्वच्छता विभागाचे कर्मचारी आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले; परंतु मदत मिळत नाही. फक्त काळे आईल आणून ते डबक्‍यांमध्ये टाकले जात आहे, त्यामुळे अळ्या कमीहोणार नाहीत. धुराडे मशीनद्वारे कधी तरी फवारणी केली जाते. फक्त रस्त्यांवरच नाही तर घराघरांमधून फवारणी करण्याची गरज आहे.
-राजेंद्र भोस, आरोग्य सेवक

नगर परिषदेने डेंग्यु निर्मूलनासाठी बैठक बोलावली होती; परंतु त्याचेवळी जिल्हा अधिकाऱ्यांनीही बैठक बोलावल्याने मी उपस्थित राहू शकलो नाही. शहरात साथ सुरू आहे; रुग्णाची तपासणी झाल्यावर त्याच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या तर डेंग्यू आहे, असे आम्ही समजतो.यावर नियंत्रण ठेवण्याचे काम नगर परिषदेचे आहे. आम्ही फक्त त्यांना मदत करू शकतो. उपाययोजना त्यांनाच करावी लागेल. आम्ही साथ येण्याआधीपासून नगर परिषदेबरोबर पत्रव्यवहार केला आहे; पण त्यांनी उपाययोजना केली नाही.
– राजेंद्र शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)