शिरूर, मावळात मतदानासाठी केंद्रे गजबजली

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर व मावळ मतदारसंघात सोमवारी (दि.29) मतदान होणार असून प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. दोन्ही मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दुपारपासून अधिकारी पोहचण्यास सुरुवात झाली. ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सांयकाळपर्यंत अधिकारी व कर्मचारी पोहचले. यानंतर अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज केली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी, हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. तर मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. दोन्ही मतदारसंघात मिळून 4 हजार 800 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीचे साहित्य नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आदींचा समावेश होता. यानंतर मतदान केंद्रनिहाय कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले. या पथकामध्ये पोलिसांचीही समावेश आहे. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी एसटी व बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी कर्मचाऱ्यांना एकत्रित जाण्याचा तसेच एकत्रित येण्याच्या सूचना देण्यात आले. मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहचल्यानंतर त्याची माहिती त्यांनी झोनल अधिकारी यांना कळविली.

प्रत्येक 10 ते 12 मतदान केंद्राच्या मागे एका झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी मतदान केंद्रांची पाहणी करणार आहे. मतदान केंद्रावर काही समस्या निर्माण झाल्या तर झोनल अधिकारी याबाबत निर्णय घेणार आहे. या अधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त कर्मचारी आणि राखीव मतदान यंत्रे असणार आहे. जर शहरी भागात एखाद्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास 20 मिनिटात त्या मतदान केंद्रावर नविन मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर ग्रामीण भागात सुमारे 30 ते 35 मिनिटात संबधित केंद्रांवर नविन मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या www.electroalsearch.in , www.ceo.maharashtra.gov.in , www.nvsp.in संकेतस्थळावर मतदार यादीतील नाव, मतदान केंद्रे शोधता येणार आहे. व्होटर हेल्पलाईन या ऍपवर ही माहिती मिळणार आहे.

निवडणुक विषय तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी आवश्‍यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीची सदर नियंत्रण कक्षामध्ये नोंद घेण्यात येणार असून विविध पथकामार्फत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. 020-26121281,26121291, 26121231,26121271 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान होणाऱ्या क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी अथवा कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसेल तर सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व संस्था, आस्थापने यांना दिल्या आहेत. ज्या संस्था कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी अथवा वेळेची सवलत देणार नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे राम यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)