शिरूर तालुका शिक्षक संघाचा पेंशन दिंडीस पाठींबा

टाकळी हाजी- पुणे शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने 2 ऑक्‍टोबर रोजी शिवनेरी ते मंत्रालय, मुंबई येथे निघणाऱ्या पेंशन दिंडीस सक्रीय पाठींबा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी जाहीर केला आहे. नोव्हेंबर 2005 पासून सेवेत येणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने 1982 ची जुनी पेंशन योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना लागू केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्याने दरमहा शासनाकडे आपले अंशदान जमा केल्यावर तेवढीच रक्कम शासन त्यात जमा करणार आहे. या जमा रकमेवरचे व्याज मिळून एकत्रित रकमेचा काही हिस्सा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला पेंशनच्या रूपाने दरमहा मिळणार आहे, अशी अंशदायी पेंशन योजना आहे. याशिवाय जुन्या पेंशन योजनेप्रमाणे इतर कोणतेही लाभ नवीन योजनेत नाहीत. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यात अंसतोष आहे. “समान काम, समान दाम’ या न्यायाने आम्हालाही जुन्या पद्धतीनेच पेंशन मिळाले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र राज्यातील 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेंशन हक्क संघटन करून त्या माध्यमातून 2 ऑक्‍टोबरला शिवनेरीपासून सुरू झालेली पेंशन दिंडी ठाणे-मुंबई मंत्रालय येथे पोचणार आहे. या पेंशन दिंडीसाठी लागणारा निधी शिरूर तालुक्‍यातील जुन्या पेंशनधारक प्राथमिक शिक्षकांच्या वतीने अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी जुनी पेंशन हक्क संघटनाकडे जमा केला आहे. दिंडीत जुने पेंशनधारक शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठींबा देणार आहेत, अशी माहिती सरचिटणीस वामनराव सातपुते आणि कोषाध्यक्ष संपत पोखरकर यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)