शिरूरमध्ये मनसेचे रस्त्यावरील पाण्यात नौका विहार!

-आतातरी प्रशासनाला जाग येईल का? अनेकांचा सवाल : निवेदन देऊनही प्रशासनाचे दुर्लंक्ष
– रस्त्यावर साचले गुडघाभर पाणी
शिरूर – शिरूर शहराअंतर्गत पुणे-नगर रस्त्यावर टपाल कार्यालयासमोर अर्धवट रस्त्यांची कामे झाल्यामुळे याठिकाणी पावसाचे पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. याचा येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका यांना सांगूनही याकडे कोणी लक्ष देत नाही, असे आढळून आले. त्यामुळे शिरूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या पाण्यात नौका विहार आंदोलन करुन अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल यावेळी करण्यात आला.
याबाबत शिरूर शहर मनसेच्या वतीने या खड्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदार यांना दि.22 ऑगस्ट रोजी पत्र दिले होते. यात आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. शिरूर शहरातील नगर-पुणे रस्त्यावर टपाल कार्यालयासमोर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामधील साचलेले पाणी व त्याच्या उपाययोजना करण्याचे निवेदन देऊन ही उपाययोजना न झाल्याने कागदी होड्याबरोबरच खरी होडी (नौका) आणून नौका विहार आंदोलन केले.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सुशांत कुटे, वसीम सय्यद, बंडु दुधाणे, रवी लेंडे, मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली साखरे, रिपाइंचे अध्यक्ष निलेश जाधव, चारुशिला विधाते, विकास साबळे, ललीत गुगळे, अनिकेत खोतकर, ज्ञानेश्वर घावटे, अयाज शेख आदी उपस्थित होते.
यावेळी मनसे शहर अध्यक्ष सुशांत कुटे म्हणाले, सध्या शहरात डेग्यूची साथ आहे. यातच रस्त्यांवर पाणी साचत असून त्याचा त्रास नागरिक, स्थानिक रहिवासी, शालेय विद्यार्थी, वहानचालक यांना नाहक त्रास होत आहे. या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका संभवत आहे. तरीही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे आढळत आहे. याचबरोबर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याच रस्त्याने ये-जा करीत असतात. त्यांचेही याकडे दुर्लंक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे, असेही आंदोलकांनी व्यक्‍त केले. या बाबीकडे यापुढे रस्त्यातील खड्‌डे बुजवून त्यात सुधारणा झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशाराही सुशांत कुटे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)