शिरूरमध्ये घराचे छत कोसळून एक जखमी

घटनास्थळी अनेकांनी दिली भेट : परिसरात घबराटीचे वातावरण
शिरूर  – शिरूर शहरातील हुडको वसाहत (संभाजीनगर) येथे एका घराचे छत कोसळून एकजण जखमी झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरूर शहरातील हुडको वसाहतीमधील चरण चौधरी यांचे घर आहे. गुरुवारी (दि. 10) दुपारी चरण चौधरी यांचा मुलगा महेश चौधरी हा घरी डेंग्यूने आजारी असून तो घरी झोपला असता अचानकपणे घराचे छत महेश याच्या अंगवर कोसळले. त्यामुळे महेशच्या चेहऱ्याला आणि छातीला जबर मुक्का मार लागला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी नगरसेवक संदीप गायकवाड, समता परिषदेचे किरण बनकर, नगरसेवक मंगेश खांडरे, संजय देशमुख, पाणी पुरवठा समितेचे सभापती मुझफ्फर कुरेशी, आरोग्य समितीचे सभापती सचिन धाडीवाल, नगरसेविका उज्वला वारे, संतोष शितोळे, प्रवासी संघाचे अनिल बांडे, मनविसेचे अविनाश घोगरे, शिरूर तालुका संघटक कैलास भोसले, शहर संघटक राजेंद्र शिंदे, युवा सेना शहर अधिकारी सुनील जाधव, तुकाराम खोले, भाजपाचे तुषार वेताळ, शैलेश जाधव, कलीम सय्यद, संजय बांडे आदी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, शुक्रवारी (दि.11) सकाळी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता संजय कुंभार, शहर अभियंता शंकर कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी महेश चौधरी यांच्याशी चर्चा करून आवश्‍यक उपाययोजनाविषयी सूचना दिल्या.
घटनेमुळे हुडको घरकुलची दयनीय अवस्था
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 365 घरांची ही हुडको घरकुल योजना 1989 साली निर्माण झाली. त्यानंतर या घरावरील हप्ते भरल्यानंतर 2006 पर्यंत ही घरे नावावर होणे अपेक्षित होते. मात्र, 12 वर्षे होऊनसुद्धा आज देखील ही घरे मूळ घरमालकांच्या नावावर नाहीत. तसेच या घरची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून राहवे लागत आहे. याबाबत अनेक वेळा आश्वासने देवून सुद्धा अद्यापपर्यंत घरे नावावर न झाल्याने नागरिक हतबल झाले आहेत. स्वत:ची घरे असून सुद्धा त्या ठिकाणी काहीही करता येत नसल्याने नागरीकांनपुढे ही घरे कधी नावावर होणार? असा प्रश्न पडत आहे. मात्र, या गंभीर प्रश्नांबाबत अनेक निवडणुकीत आश्वासने दिली गेली. मात्र, कुणीही या विषयावर आश्वासने पूर्ण करताना दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)