शिरूरचे शिवधनुष्य विरोधक पेलणार काय?

लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू : शिवसेनेचे कडवे आव्हान

सचिन खोत

पुणे – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे मतदारसंघात हवेची दिशा बदलत आहे. सभा, कार्यकर्ता मेळावे, संघटन, उद्‌घाटन आदी माध्यमातून गरमागरम स्थिती निर्माण होत आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मजबूत संघटन, दांडगा लोकसंपर्क आदी कारणामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विरोधक वादळात शिवधनुष्य पेलणार काय, याची उत्सुकता जिल्ह्यात लागून राहिली आहे. राष्ट्रवादीकडून आठ दिवसांत लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होणार असल्यामुळे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नारायणगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिरूर लोकसभेसाठी आठ दिवसांत उमेदवारी देणार असल्याची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघात गुलाबी थंडीत राजकीय हवेचे झुळूक जाणवू लागली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मजबूत संघटना आहे. सहकारी साखर कारखाने, सहकाराचे जाळे, सोबत आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूरचे तत्कालीन लोकप्रतिनिधी होते. राजकीय वाऱ्यात ही गणिते आता कागदावरच राहिली आहेत. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत खासदार आढळराव पाटील यांच्या झंझावातसमोर राष्ट्रवादीचा निभाव लागला नाही. लोकसभेची भौगोलिक रचना ही पुणे शहर आणि जिल्ह्यात विस्तारली आहे. त्यात हडपसर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
खासदार आढळराव पाटील यांनी दोन टर्म खासदारकी भूषविली आहे. त्यामुळे मतदारसंघात मजबूत संघटन असताना राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागत असल्यामुळे नेत्यांच्या जिव्हारी लागत आहे. गेल्या दहा वर्षांत बऱ्याचवेळा ही खंत वरिष्ठ नेते जाहीर व्यासपीठावर बोलून दाखवित असतात. मात्र, कागदावरील बेरेजेचे राजकारण आणि तळागाळातील मतांची बेरीज याचा हिशेब लागत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागत आहे.
लोकसभा मतदारसंघात शिरूर- हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड, हडपसर या मतदारसंघात राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, 2014 च्या लाटेत शिरूर- हवेली, जुन्नर, खेड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अशोक पवार, सुरेश खाडे, वल्लभ बेनके यांना पराभव पत्करावा लागला. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. मात्र, तिथे शिवसेना आणि भाजपने मुसंडी मारली आहे.
राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतील गट- तट, हेवेदावे बाजूला देऊन तळागाळात संघटन बांधणीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. गटागटांतील मतभेद मिटविण्याचे काम सुरू असताना नेत्यांमधील “मनभेद’ मिटविण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.

  • राष्ट्रवादीतील मनभेद मिटणार काय?
    शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये दुफळी आहे. त्यामुळे कागदावरची बेरीज निवडणुकीवेळी कामाला येत नाही. त्याचा परिणाम स्थानिक निवडणुका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पडसाद उमटले जातात. आंबेगाव, शिरूर- हवेली, खेड विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय वारंवार येत आहे. त्यामुळे माजी मंत्री अजित पवार, खासदार सुळे यांच्याकडून नेते आणि कार्यकर्त्यांमधील मनभेद मिटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार काय, असा सवाल निष्ठावंत कार्यकर्ते करीत आहेत.
  • दुष्काळ, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर रान तापले
    शिरूर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी मातब्बर नेते नाखूश होते. त्यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली. प्रस्थापिताविरोधात आलेली लाट आणि भाजप आणि शिवसेनेला असलेली अनुकुलता आदी कारणामुळे खासदार आढळराव पाटील यांनी बाजी मारली. भाजप सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्‍न, नोटाबंदी, जीएसटी, दुष्काळी स्थिती आदी मुद्दे यंदाच्या निवडणुकीत प्रभावी ठरणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीकडून रान तापवले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधील असलेल्या असंतोषाला खतपाणी घालण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू आहे. मतदारसंघात विविध कार्यक्रमात या प्रश्‍नांभोवती सभा, व्यासपीठ गाजविले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला या प्रश्‍नांना घेऊन मतदारांसमोर जाण्यास सोयीस्कर आहे.
  • कोण असणार तगडा उमेदवार
    शिरूर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आठ दिवसांत उमेदवार जाहीर होणार असल्यामुळे मतदारसंघात याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उत्सुकता आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दांडगा लोकसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी, जोडीला विकासकामांची यादी ही जमेची बाजू आहे. त्यातून ते मतदारांसमोर जात आहेत. त्यामुळे दहा वर्षांतील कामांचा अनुभव यंदा त्यांच्या कामी येणार आहे. नेते, स्थानिक नेते यांच्यापासून अलिप्त राहून मतदारांनी आढळराव पाटील यांना साथ दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला शिवसेनेविरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेनेचे शिवधनुष्य पेलणार काय, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)