शिरुरमध्ये कार चोर बारा तासात जेरबंद

शिरूर- शिरुर येथून चोरलेला ऐवज आणि गुन्ह्यातील आरोपी बारा तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिरूर येथून रविवारी (दि.16) रात्री 8.30 च्या सुमारास संकेत पाटील जाधव (रा. गोलेगाव, ता.शिरूर) हे त्यांचे अल्टो कारमधून मित्रासोबत कामासाठी शिरूर येथे आले असताना कामठीपुरा शिरूर येथून संशयित आरोपी नारायण गव्हाणे आणि त्यांचे दोन साथीदार यांनी त्यांचेकडील अल्टो कार आणि मोबाइल असा सुमारे 44 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याची शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी नारायण नाझर गव्हाणे (वय 30, रा कोहकडी, ता.पारनेर, जि.अहमदनगर) हा
गुन्हा घडल्या पासून फरारी होता. संशयित आरोपी नारायण गव्हाणे हा नगर रोड बेलवंडी फाटा (जि.नगर) या भागात असलेची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोपट गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम यांच्या पथकाने बेलवंडी फाटा येथून शिताफीने त्यास ताब्यात घेतले. याचा पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटमास हे करीत आहेत. संशयित आरोपी हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी नगर व पुणे जिल्ह्यात बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यास पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई सुरु असून याबाबत त्यास नोटीस काढली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)