शिरुरच्या मैदानात “इंजिन’ धावणार?

निशा पिसे

पिंपरी – लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असतानाच मनसेकडूनही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मनसेने शिरुरमधून दुसऱ्यावेळी उमेदवार उतरविण्याची तयारी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडताच महिनाअखेरीस बैठक घेवून त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिरुर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयाचा “चौकार’ मारण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या तोडीसतोड उमेदवारांची वाणवा सर्वच विरोधी पक्षांना जाणवत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उतरण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, साहेबांचे आदेश आले तर शिरुरमधून लढू अशी पुस्ती त्यांनी जोडल्याने त्यांचे हे वक्तव्य म्हणजे पवार गुगली असल्याची चर्चा आहे. एकेकाळी या मतदार संघावर कॉंग्रेसचा वरचष्मा होता. मात्र, 1999 नंतर कॉंग्रेसला उतरती कळा लागली. कॉंग्रेसकडे खमका चेहराच नसल्याने आघाडीच्या जागा वाटपात कॉंग्रेसला कायम या जागेवर पाणी सोडावे लागते. याही वेळी कॉंग्रेसची तीच परिस्थिती आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपकडेही उमेदवाराची वाणवा आहे. युती न झाल्यास कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकायची याबाबत भाजपची अद्याप चाचपणी सुरू आहे. तथापि, काही महिन्यांपूर्वी मनसेतही मरगळ पसरली होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी खासदार आढळरावांविरोधात जाहीरपणे शड्डू ठोकले. जुन्नरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मंगलदास बांदल यांनी राज ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनीही त्यांना हिरवा कंदील दाखवल्याचे समजते.

मनसेकडून पर्यायी चेहरा म्हणून शरद सोनवणे यांनाही विचारणा झाली आहे. राज साहेबांचे आदेश असतील तर लोकसभा लढवू, असे शरद सोनवणे सांगत आहेत. येत्या 27 जानेवारी रोजी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित विवाहबद्ध होत आहेत. हा सोहळा पार पडताच जानेवारी अखेरीस राज ठाकरे बैठक घेवून लोकसभा निवडणुकीतील पक्षाची भूमिका तसेच शिरुरच्या उमेदवाराबाबत शिक्कामोर्तब करणार असल्याचे समजते. त्यामुळ मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. शिरुरच्या रणसंग्रामात इंजिन धावल्यास येथील निवडणूक रंगतदार होणार हे निश्‍चित.

वातावरण निर्मितीसाठी झगडा
मागील लोकसभा निवडणुकीनंतर शिरुरमध्ये मनसे मोठ्या प्रमाणावर “बॅकफूट’वर गेली आहे. त्यावेळचे उमेदवार अशोक खांडेभराड यांना अवघी 34 हजार 683 मते होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जुन्नर मतदार संघातून विजयी झालेल्या शरद सोनवणे यांनी मनसेचे नाक राखले. मात्र, यावेळी त्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात गटनेते सचिन चिखले यांच्यामुळे मनसेचे थोडे बहुत अस्तित्व जाणवते. जुन्नर, शिरुर आणि भोसरी वगळता अन्य मतदार संघात मनसे नाजूक स्थितीमध्ये आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी मनसेला मोठा झगडा द्यावा लागणार आहे. अशा परिस्थितीत खासदार आढळराव पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधण्याचा एकमेव पर्याय मनसे आजमावत आहे.

मागील काही काळात मनसेने तळागाळातून पक्ष संघटन बांधणीवर भर दिला आहे. त्यामुळे यावेळचे चित्र वेगळे असेल. मनसैनिक यावेळी बोलून नव्हे तर करुन दाखवणार आहेत. आमदार शरद सोनवणे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल हे दोन पर्याय मनसेसमोर आहेत. 27 जानेवारीनंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे बैठक घेवून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार आहेत. उमेदवारीबाबतचे स्पष्ट आदेश आले नसले तरी मनसैनिकांचे काम सुरू आहे.
– सचिन चिखले, महापालिका गटनेते, मनसे.

शिरुर लोकसभा मतदार संघ म्हणजे काहीजण संस्थान असल्यासारखे वावरत आहेत. त्यामुळे या मतदार संघाचा विकास खुंटला आहे. मागील दीड वर्षांपासून कामाला सुरूवात केली आहे. पाण्यापासून ते “रेडझोन’पर्यंत अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. निसर्गसंपन्न असा हा मतदार संघ आहे. मात्र, विकासाअभावी अनेक समस्यांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. विकासाचा मुद्दा घेवून काहीजणांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. याबाबत आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यात उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल.
– मंगलदास बांदल, माजी सभापती, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)