शिरवळच्या ऐतिहासिक पाणपोईची अस्तित्वासाठी लढाई

संदीप राक्षे,
सातारा, दि. 22
ग्वाल्हेर बेंगलोर आशियाई महामार्गावर शिरवळ गावाच्या हद्दीतील पेशवेकालीन पाणपोईचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. केवळ रस्त्यात अडचणं नको म्हणून या पाणपोईला हटवण्याचा घाट रस्ते विकास महामंडळाने घातल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिरवळ ग्रामस्थ, रायरेश्वर प्रतिष्ठान यांनी या कामाला हरकत घेतली असून हा ऐतिहासिक ठेवा जपला जावा याची मागणी केली आहे. अठराव्या शतकात खंबाटकीच्या खामटाके पासून ते सिंहगडाच्या दरम्यान शिवपर्वानंतर मराठयांनी गनिमांशी बावीस वेळा लढाया केल्या. रावजी पंत चिटणीसांच्या बखरीत या लढायांचे बरेचसे वर्णन आले आहे. तंजावर आणि बेंगलोरच्या मराठी सदरे वर जाताना सैनिकांच्या मोहिमांसाठी शिरवळ गावाच्या हद्दीवर पाणपोई उभारण्याची सूचना दस्तुरखुद्ध श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली होती. या पाणपोईला सव्वादोनशे वर्षाचा इतिहास असून या पाणपोईची रचना ही हेमाडपंती देवळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या पाणपोईसाठी पगारी सेवक ठेवले जात असत. या पाणपोईत चार हंड्यांची व्यवस्था होती. सातारा-नायगाव-सारोळा-धांगवडी-कामथडी येथे पाणपोयांची रचना अस्तित्वात होती. मात्र शिरवळ हद्दीतील हेमाडपंती शैलीची ही पाणपोई मात्र व विशेष रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आज देखभालीअभावी दुर्लक्षित आहे. पुणे-सातारा महामार्ग सहापदरीकरणाचे काम झटपट उरकण्याच्या तयारीत रस्ते विकास महामंडळ असून ही पाणपोई अगदी रस्त्यातच आली आहे. महामार्गावर विनाकारण अपघात नको म्हणून ही पाणपोई हटवण्याची सुप्त गडबड कानांवर गेल्याने शिरवळ ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या वास्तूचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी रायरेश्वर प्रतिष्ठान शिरवळ व गड किल्ले संवर्धन समितीने विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर या पाणपोईच्या रेखांकनाचे काम प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच पूर्ण करण्यात आले. डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक सचिन जोशी व वास्तूविशारद राहूल चेंबूनकर यांच्या सहकार्याने हे रेखांकन करण्यात आले असून याचा अहवाल राज्यसरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

सदर पाणपोईची रचना व त्याच्या व्यवस्थेच्या आदेशाबाबतचे लेखी पत्र नानासाहेब पेशवे यांनी शिरवळच्या सरदारांना धाडले होते. ते पत्र प्राध्यापक सचिन जोशी यांच्या संग्रहात आहे. या पाणपोई च्या बांधकामासाठी दगड गूळ, चुना, हरभरे, इ. साहित्य पुण्यावरून शिरवळला रवाना करण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. या वास्तूची कोणतीही पडझड होऊ देणार नाही याची हमी रायरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर शेळके यांनी ‘प्रभात’ शी बोलताना दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)