सोमाटणे (वार्ताहर) – शिरगाव परिसरात सध्या बाजरीचे पीक जोमात आले आहे. प्रगतशील शेतकरी भानुदास गोपाळे यांच्या शेतात तीव्र उन्हात रस्त्याच्या कडेला हिरवेगार आलेले बाजरीचे पीक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करत आहे.
गोपाळे यांनी आपल्या शेतात चार वर्षे उसाचे पीक घेतले होते. त्याची तोड झाल्यावर त्याजागी बाजरी पीक घेण्याचा विचार केला. त्यांनी तीन एकरमध्ये बाजरीची पेरणी केली. अत्यंत कामो दिवसात भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या बाजरीला एक खुरपणी, एक वेळा रासायनिक खत व चार वेळा पाणी अशा अल्प मेहनतीत पीक अगदी डोलदार आलेले आहे. एका झाडाला जवळपास 10 ते 12 कोंब आलेले असल्याने फुटावा उत्तम आहे. सध्या पडत असलेले उन बाजरी पिकासाठी पोषक असेच आहे. त्यामुळे उत्पन्न देखील दरवर्षी पेक्षा भरघोस मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वर्षी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात बाजरीचे पीक घेण्यात आले आहे.
उन्हाच्या वाढत्या तीव्रेतेत देखील परिसरात बाजरी पीक डोलदार उभे आहे. परिसरात पवना नदीचे मुबलक पाणी असल्याने पिकास भरपूर पाणी मिळत आहे. त्यामुळे या परिसरातील शिरगाव, गोदुम्ब्रे, दारूम्ब्रे, सोमाटणे, चांदखेड, कासारसाई, बेबड ओहोळ, परंदवडी, शिवणे आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरी करत आहेत. भात काढणी झाल्यावर याच जमिनीत उन्हाळी बाजरी घेतली जात असल्याने दुबार पिक शेतकऱ्याच्या हाती लागत आहे. तर मुबलक पाणी आणि मेहनतीमुळे देखील पिक चांगले येत असल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा