शिरगावच्या पाझर तलावाची गळतीमुळे दुर्दशा

-प्रशासनालाही फुटेना पाझर
-परिसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी बारमाही पाणी टंचाई

धनंजय घोडके

वाई – वाईच्या पूर्वेला दुष्काळी भागाचा तारणहार असणाऱ्या शिरगाव येथील पाझर तलावाची गळतीमुळे दुदर्शा झाली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी बारमाही पाणी टंचाई आली आहे. या तलावच्या दुरुस्तीच्या कामात प्रचंड गैरव्यवहार झाल्यानेच कायम स्वरुपी गळती निघाली नाही. यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून नव्याने पाझर तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

शिरगांव वाढत्या लोकसंख्येमुळे भागातील सर्वात मोठे गाव झाले आहे. वाईचा पूर्व भाग कमी पावसाचा प्रदेश आहे. तालुक्‍यात सर्वत्र तुफान पाऊस पडत असला तरीही शिरगांव घाटात पावसाळा संपतानाच पावसाला सुरुवात होते. या परिसरात धूळवाफेवर पेरण्या करण्याची प्रथा वर्षानुवर्षे आहे. शिरगावच्या पाझर तलावाचा शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव आधार आहे. परंतु, शिरगांव व परिसराचा तारणहार म्हणून ओळख असणाऱ्या तलावाची गळतीमुळे अक्षरशः दुर्दशा झाली आहे. तलावाला लागलेली ही गळती म्हणजे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या विचारांवरचा पडलेला दुष्काळ, अशी काहीशी अवस्था या पाझर तलावाच्या बाबतीत घडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्जन्यमान कमी असणाऱ्या भागात शासन लाखो रुपये दरवर्षी जलशिवार योजनेवर खर्च करते. जेणेकरून उन्हाळ्यात त्या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकरचा आधार घ्यावा लागू नये. परंतु, या पाझर तलावाच्या दुरुस्तीवर पाणीपुरवठा विभागाने लाखो रुपये खर्च करूनही गळती काढण्यात अपयश आले आहे. पावसाळ्यानंतर एक महिनासुद्धा पाणीसाठा या तलावात शिल्लक राहत नाही. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

शिरगांवच्या तलावाच्या दुरुस्तीच्या कामात प्रचंड गैरव्यवहार झाल्यानेच कायम स्वरूपी गळती निघत नाही. या तलावाच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भागातील संतप्त शेतकरी करत आहेत. निसर्गाचीच या भागावर वक्रदृष्टी झाल्याने मानवनिर्मित छळवाद सोसावा लागला तर त्यात ते नवल कसले! पाणी पुरवठा विभागाकडून डोळ्यावर पट्टी न बांधता, जलसंधारणच्या कामामध्ये भ्रष्टाचाराला थारा न देता गळतीचे काम प्रामाणिकपणे केल्यास या पाझर तलावात पाण्याचा साठा होवून या भागाचा दुष्काळ कायमचा मिटेल.

पिण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो, पण तसे झाल्यास या पाझर तलावाच्या नावे दरवर्षी शासनाकडून निधीची मागणी कशी करता येणार! असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. या वर्षी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिरगावचा सदस्य निवडून गेल्याने ते त्यांच्या गावातील पाझर तलावसंदर्भात किती लक्ष घालतायत ते आता येणारा काळच ठरवेल!

शिरगाव तलावाला निसर्गाच लाभलं देणं

शिरगाव हे वाई-वाठार या मुख्य रस्त्यावर असून हा तलाव शिरगाव घाटात असून या तलावाच्या तीनही बाजूने डोंगररांगा आहेत. हा अतिशय निसर्ग रम्य परिसर असून या भागाला जणू निसर्गाची देण लाभली आहे. या तलावात बारमाही पाणी असल्यास मराठी चित्रपट सृष्टीला या भागाची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. तसेच या भागात चित्रपटांचे शुटींग आल्यास या भागातील लोकांच्या हाताला काम मिळेल. त्याद्वारे या परिसरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होवू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)