शिमर अॅण्ड ग्लिटर

कपडे, अॅक्‍सेसरीजमध्ये काही ट्रेंड असे येतात की त्या ट्रेंडच्या सुरूवातीला भयानक, चित्रविचित्र रंगसंगती असलेलं काही कोण कसं घालणार असा प्रश्न पडतो, पण एकदा का ट्रेंड रूळला की मग आपसूकच त्याची सवय होऊन जाते व तो लोकांनीच दिलेल्या प्रसिद्धीतून लोकप्रियही होऊन जातो. असाच एक ट्रेंड सुरू झालाय तो शिमर ड्रेसेसचा’ आणि ग्लिटर’चा.

शिमर ट्रेंड म्हणजे काय तर भडक, झगमगीतपणा. फॅशन इण्डस्ट्रीत कोणते ट्रेंड कधी मार्केटवर कब्जा करतील काहीच सांगता येत नाही. त्याचप्रमाणे विस्मरणात गेलेला ग्लिटरचा ट्रेंड पुन्हा आलाय. पुढच्या आठवडय़ापासून कॉलेज डेज्‌, फेस्टिव्हल, पार्टी असं सगळं सुरू होईल. तयारीसाठी आणि अर्थात वेगळ्या लूकसाठी काय काय घ्यावं अशा गोष्टींवर अनेकांचे विचार सुरू असतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तरूणाईमध्ये प्रसिद्ध असलेल्या काही महत्वाच्या फॅशन स्ट्रीट्‌सवर मेटल किंवा शिमर प्रकारातले पार्टीवेअर ड्रेसेस, टॉप झळकू लागले आहेत. हे ड्रेसेस दुकानांबाहेर दिसले की त्यांचा भडकपणा पाहूनच कदाचित ब-याच मुलींनी भुवया उंचावल्या असतील पण इंटरनॅशन फॅशनमध्ये हा ट्रेंड खूपच हिट होत चालला आहे. मग पश्चिेमकडून आलेल्या या ट्रेंडने आपल्या फॅशन इण्डस्ट्रीत प्रवेश केला नाही तर नवलच म्हणावं लागेल, त्यामुळे हळूहळू आपल्या हायस्ट्रीट फॅशनमध्ये शिमर ड्रेसेसनी एंण्ट्री घेतली आहे.

या शिमर ड्रेसेसमध्ये ऑफ व्हाईट, गोल्डन या दोन रंगांची चलती आहे पण त्याचबरोबर कॉपर, नेव्ही ब्लू, ब्लॅक हे रंगही हिट होत चालले आहेत.

ज्यांना वनपिस घालायचा नसेल त्यांच्यासाठी टॉप, स्कर्ट, शिमर जॅकेट्‌सही आले आहेत त्यामुळे ते ही ट्राय करू शकता. रात्रीच्या वेळी हे शिमर ड्रेसेस छान दिसतात त्यामुळे कॉलेजमध्ये रात्री किंवा संध्याकाळी पार्टी असेल तर शिमर लुकचा ड्रेस घालायला हरकत नाही.

ज्यांना शिमर ड्रेसेसचा भडकपणा आवडत नसेल त्यांनी प्लेन रंगाच्या टॉपवर ट्रेंडी शिमर जॅकेट जरी घातलं तरी ते अधिक उठून दिसेल. त्यावर सिल्व्हर किंवा गोल्डन मेटल हॅंड बॅग घेतली तर आणखी छान दिसते. शिमर ड्रेसेस हे खूप चकमकीत असे असतात त्यामुळे त्यावर फारश्‍या अॅक्‍सेसरीज घेण्याची गरजही लागणार नाही आणि त्या नाही घालाल तर उत्तमच. तुम्हाला हे शिमरचे ड्रेस अनेक ठिकाणच्या फॅशन स्ट्रिट स्टॉल्सवर मिळतील.

मेकअपमध्ये ग्लिटरचा ट्रेंड
या वर्षीपासून ग्लिटर आयलायनरची क्रेझही वाढत चालली आहे. सोनेरी, चंदेरी, गुलाबी, निळ्या, हिरव्या, कॉपर अशा रंगांमध्ये ग्लिटर आयलायनर प्रामुख्यानं आलं आहे. आतापर्यंत काळ्या रंगाचं आयलायनर आणि डोळ्यांना आयशॅडो असा ट्रेंड होता. पण ग्लिटर आयलायनरनं हा ट्रेंड थोडा बदलला आहे.

या नव्या रंगात आलेल्या ग्लिटर आयलायनरची जाड रेघ डोळ्याच्या कडेवर ओढली की झाला मेकअप. हे ग्लिटर आयलायनर इतके उठून दिसतात की डोळ्यांना लावल्यावर इतर कोणताही मेकअप करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे या पार्टीसाठी शिमर ड्रेसेवर मॅचिंग ग्लिटर लायनर लावलं तर लुकमध्ये चांगला फरक पडू शकतो. वर आणि खाली दोन वेगवेगळ्या रंगात ग्लिटर लायनर देखील लावू शकता, अर्थातच यात तुम्हांला अजून काही नवीन सुचलं तर तसा मेकअपही तुम्ही नक्कीच करून पाहू शकता. कारण तरूणांच्या ग्रुप्समध्ये नेहमीच काही हटके करणा-याची स्टाईल हिट होते हे मात्र नक्की!

– वेदा सत्यप्रकाश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)