शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ

– महापालिका माध्यमिक विभागाचा निर्णय

पिंपरी – महापालिकेच्या माध्यमिक शाळेत मानधन तत्त्वावर भरण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात महापालिकेने वाढ केली आहे. हे मानधन चार हजार रुपये प्रति महिन्यावरून आठ हजार रुपये प्रतिमहा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, आगामी काळात माध्यमिक शाळेसाठी मानधन तत्त्वावर भरण्यात येणाऱ्या शिक्षकांना पालिकेकडून प्रति माह आठ हजार रुपये मानधन मिळणार आहे, अशी माहिती नगरसेवक कैलास बारणे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अठरा माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे सुमारे 9 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा सरासरी निकाल, विद्यार्थ्यांना देण्यात आलेली बक्षिसे व नैसर्गिक वाढ या तत्त्वावर विद्यार्थी व तुकडी संख्येत वाढ होत आहे. सध्याच्या विद्यार्थी तुकडीनुसार काही विषयांचे शिक्षक तसेच सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व रजा इत्यादी कारणास्तव शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यासाठी आगामी काळात 50 शिक्षकांची मानधन तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे.

मागील काळात तास “बेसिक’वर शिक्षकांना प्रतिमहा चार हजार रुपये प्रमाणे मानधन दिले जात होते. या कमी मानधनावर काम करण्यास शिक्षक नकार देत होते. त्यामुळे शिक्षकांच्या मानधनात 12 हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव गतवर्षी तत्कालीन स्थायी समिती सदस्य कैलास बारणे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडला होता. त्यावर चर्चा होऊन प्रशासनाने 12 हजार रुपयांऐवजी शिक्षकांच्या मानधनात 4 हजार रुपये वाढीचा निर्णय घेतला आहे. यापुढे, मानधन तत्त्वावरील शिक्षकांना प्रतिमहा 8 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पुढील स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

शिक्षण सेवकांना प्रति तासाला 54 रुपये मानधन स्वरुपात दिले जात होते. त्यामध्ये वाढ करण्याचा सदस्य प्रस्ताव आल्याने यापुढे मानधन तत्त्वावरील शिक्षण सेवकांना प्रतिमहा 8 हजार रुपये प्रमाणे मानधन देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
– डॉ. प्रवीण अष्टीकर, प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍त, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)